उष्णतेपासून बचावासाठी थंडपेयांना पसंती

फळांवरील महागाईमुळे सरबत महागल; सर्वसामान्यांना आर्थिक झळा

| तळा | प्रतिनिधी |

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे या उष्णतेपासून वाचण्यासाठी नागरिकांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे त्यांची पावले आता थंडपेयांच्या दुकानांकडे वळत आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी या थंड पेयांच्या किमतीत वाढ झाली असून वाढलेल्या फळांच्या किंमतीचा फटका थंडपेयांना देखील बसला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

यंदा मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच प्रचंड प्रमाणात उष्णता जाणवत आहे. उन्हातून काम करताना थकलेल्या शरीराला थंडावा देण्यासाठी नागरिकांकडून थंड पेयांना पसंती मिळत आहे. त्यामुळे त्यांची पावले आता थंडपेयांच्या दुकानांकडे वळत आहेत. त्यासाठी तळा बाजारपेठेत संत्र, मोसंबी, अननस, लिंबू, कोकम व उसाचा रस यांसारखे विविध थंडपेये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी या थंड पेयांच्या किमतीत वाढ झाली असून वाढलेल्या फळांच्या किंमतीचा फटका थंड पेयांना देखील बसला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यंदा फळांचे दर वाढल्याने त्यापासून बनविण्यात येणार ज्यूस देखील महागला आहे. त्यामध्ये 160 रु.प्रतिकिलो मिळणारे सफरचंद आता 200 रुपये प्रति किलो प्रमाणे मिळत आहेत. पूर्वी 60 रुपये किलो मिळणारे अननस आता140 रुपये प्रति किलो प्रमाणे मिळत आहे. यासह संत्री व मोसंबीच्या दरातही वाढ झाली असून 90 रुपये प्रति किलो मिळणारे आता 130 रुपये प्रति किलो प्रमाणे मिळत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना उन्हाच्या झळांसह आर्थिक झळ देखील सहन करावी लागत आहे.

लस्सी, ताकही महागले
उष्णतेपासून वाचण्यासाठी लस्सी आणि ताकाचे सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते. तसेच, बहुतांश नागरिकांना जेवल्यानंतर लस्सी अथवा ताक हे लागतेच.परंतु, लस्सी आणि ताक पिणे देखील आता महागले आहे. उष्णतेचा पारा वाढल्यामुळे बऱ्याचदा दुधावर त्याचा परिणाम होऊन दूध खराब होते. त्याचा फटका विक्रेत्याला बसतो. त्यामुळे लस्सी आणि ताक महाग झाला असून गेल्यावर्षी 10 रुपये प्रमाणे मिळणारा ग्लास आता 20 रुपयांना मिळत आहे.
सरबतांचे दर
फळं-गेल्यावर्षीचा दर-सध्याचा दर
संत्री-25-40
मोसंबी-25-40
सफरचंद-30-40
अननस-30-50
ऊस-15-20
लिंबू-10-25
Exit mobile version