हवामान खात्याचा अंदाज
| पुणे | प्रतिनिधी |
ऐन थंडीत घामाच्या धारा वाहू लागल्याने सारेजण अस्वस्थ आहेत. पण आणखी दोन दिवसांनी सध्याचे तापमान घटण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्याच्या बहुतांश भागांत निम्मा डिसेंबर कडाक्याच्या थंडीविना गेला. मात्र, पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रातील किमान तापमानात दोन ते चार अंशांनी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे काही प्रमाणात गारवा अवतरण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. मात्र, सध्या उत्तरेकडील पंजाब, उत्तर राजस्थान, हिमाचल प्रदेशात थंडीच्या लाटेची स्थिती आहे. या स्थितीमुळे महाराष्ट्रासह गुजरातमध्ये पुढील दोन दिवसांमध्ये तापमानात 2 ते 4 अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे. परिणामी काही प्रमाणात गारवा जाणवणार आहे.