| तळा | वार्ताहर |
माणगाव, रोहा, मुरूड व तळा येथील परिवहन अधिकारी, पोलीस निरीक्षक, सरपंच, ग्राम प्रमुख व तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी यांची नुकतीच सहविचार सभा गो म वेदक विद्यालयाच्या सभागृहात पार पडली.
याप्रसंगी संस्थेचे सचिव मंगेश देशमुख, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्रीराम कजबजे, वेदक विद्यालयाचे चेअरमन महेंद्र कजबजे, संस्था पदाधिकारी शिर्के गुरुजी, दीपक कोटिया, चंद्रकांत खातू, महादेव बैकर, तळा पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक शिवराज खराडे, माणगाव डेपोचे आगार व्यवस्थापक केतन देवधरकर, रोहा डेपोचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक हरीश पालकर, मुरूड डेपोचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक गौतम भोसले, तळा डेपोचे वाहतूक नियंत्रक बाळा नांदूसकर, रोहा डेपोचे वरीष्ठ लिपीक हेमंत गायकवाड, मुरूड डेपोचे वरीष्ठ लिपीक कारभारी वरीष्ठ महाविद्यायाचे प्रभारी प्राचार्य डॉ भगवान लोखंडे, गो म वेदक विद्यालयाचे पर्यवेक्षक कदम सर, ढाकणे सर, तळा पोलीस बांधव विष्णू तिडके, विविध गावातील ग्राम प्रमुख सरपंच व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी ग्राम प्रमुख व सरपंच यांनी आपापल्या गावात एसटी कायम सुरु ठेवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासंदर्भात वाहतूक निरीक्षक व संस्था पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली.तसेच बंद झालेल्या एसटी पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. या मागणीचा विचार करून माणगाव व रोहा आगार व्यवस्थापकानी लवकरात लवकर एसटी सुरु करू पण लालपरीनेच विद्यार्थी व गावातील सर्व नागरिकांनी प्रवास करावा असे आवाहन केले.
पोलीस उप निरीक्षक शिवराज खराडे यांनी सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही कायम आपल्या सोबत आहोत, आपल्या गावात एखादा वाद झाला तर तात्काळ तळा पोलीस ठाणे येथे कळवावा आम्ही तो वाद मिटवण्यासाठी कटिबद्ध आहोत असे सांगितले. संस्थेचे सचिव मंगेश देशमुख व चेअरमन महेंद्र कजबजे यांनी विद्यार्थ्यासाठी आम्ही सर्व सुविधा देत असून विद्यार्थ्याना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्वच संस्था पदाधिकारी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. या सहविचार सभेचे निवेदन प्रा पाटील एन सी तर आभार महेंद्र कजबजे यांनी मानले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्राम प्रमुख, सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.