तरुणांना शेतीकडे वळविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

| धाटाव | वार्ताहर |

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. प्रचंड काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रती प्रत्येक घटकाने आदरभाव जपला पाहिजे. आता तरुणही नोकरी व व्यवसायाला पूरक मानत शेतीकडे वळला पाहिजेत, त्यासाठी विविध सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी केले. रोहा प्रेस क्लबच्या सहयोगी माध्यमातून गुरुवारी वाशी ग्रामपंचायत हद्दीतील कारीवणे येथील शेतकरी वंदना वारगुडे, चणेरा खांबेरे येथील गणेश भगत यांचा आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी अष्टीवकर बोलत होते.

रायगड प्रेस क्लबचा आदर्श शेतकरी पुरस्कार रोहा प्रेस क्लबच्या माध्यमातून देण्यात आला. वाशी ग्रामपंचायतीच्या सरपंच वंदना वारगुडे यांना कारीवणे येथे जाऊन शेताच्या बांधावर हा पुरस्कार दिला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, रोहा सिटीझन फोरमचे आप्पा देशमुख, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र निंबाळकर, गडदुर्ग अभ्यासक सुखद राणे, युवा नेतृत्व सतीश भगत, जनार्दन ढेबे, प्रेस क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, पत्रकार, ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते तर खांबेरे येथील प्रगत शेतकरी, विविध पुरस्कारप्राप्त गणेश भगत यांच्या शेताच्या बांधावर जाऊन आदर्श शेतकरी पुरस्कार देण्यात आला.

दरम्यान, रायगड प्रेस क्लबच्या आदर्श शेतकरी पुरस्कार, शेताच्या बांधावर शेतकऱ्यांचा सन्मान उपक्रमाचा जिल्हा तालुक्यात मोठे कौतुक झाले आहे. रोहा प्रेस क्लबचा शेतकरी सन्मान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माजी अध्यक्ष शशिकांत मोरे, कार्याध्यक्ष नाना खरीवले, सरचिटणीस रवींद्र कान्हेकर, नरेश कुशवाह, संदीप सरफळे, समिधा अष्टीवकर, शाम लोखंडे, जितेंद्र जाधव, शरद जाधव, केशव म्हस्के, उद्धव आव्हाड, अंजुम शेटे, निलम सावंत व पत्रकार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version