| अलिबाग | प्रतिनिधी |
महामार्गाचे काम हा जिल्हा प्रशासनाचा प्राधान्याचा विषय आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून सुरु असून, अपूर्ण काम व कामाच्या अनियमिततेमुळे महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अपूर्ण असलेल्या कामांमुळे आणि खड्ड्यांमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. या महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळून नागरिकांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावरील बायपास, सर्व्हीस रोड यांचे मजबुतीकरण करुन गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग खड्डेमुक्त करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाच्या सद्य:स्थितीबाबत तसेच महामार्गावर होणाऱ्या अपघातांबाबतची आढावा जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक आचल दलाल, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक यशवंत घोटकर, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्रीकांत गायकवाड, वाहतूक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले की, गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरुन लाखो चाकरमनी कोकणात जातात. या काळात त्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी पुलांची बांधकामे सुरु आहेत, त्याठिकाणी वाहतूक गतिमान होईल यासाठी खड्डे तात्काळ बुजवावे. संपूर्ण महामार्गावर दिशादर्शक फलक, बाण ठळकपणे लावावे. आवश्यकतेप्रमाणे ठिकठिकाणी रिफ्लेक्टर लावावेत, गरज असलेल्या पुलावर सुरक्षेसाठी सुरक्षा जाळ्या लावाव्यात. रायगड जिल्ह्यातील पर्यायी मार्गाचे आवश्यकतेप्रमाणे तात्काळ डागडुजी, दुरुस्ती करण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिल्या. महामार्गाच्या कामामध्ये प्रस्तावित असलेल्या सर्व सर्व्हिस रोड, भुयारी मार्ग, साईडपट्ट्या यांचे काम प्राधान्याने पूर्ण करावे. सर्व संबंधित यंत्रनेने काम पूर्ण झाले की नाही याची खातरजमा करावी. तसेच गणेशोत्सवादरम्यान माणगाव, इंदापूर या शहरात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने आणि महामार्ग प्राधिकरण यांनी ट्राफिक वार्डन नेमण्यात यावेत, या ठिकाणची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणानी विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिल्या आहेत.
महामार्ग खड्डेमुक्त करा; जिल्हाधिकारी किशन जावळेंचे निर्देश
