महाविद्यालयाचा पदवी प्रदान सोहळा

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील दोशी वकील आर्टस्‌‍‍ अँड जी.सी.यू. बी. सायन्स अँड कॉमर्स कॉलेजचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा तसेच पदवी प्रदान कार्यक्रम मंगळवारी (दि.7) संपन्न झाला. या कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्थ व चेअरमन श्रीनिवास बेंडखळे, उपाध्यक्ष अरुणा दिलीपशेठ, सदस्या साक्षी गांधी यांच्यासह महाविद्यालयाचे प्रा.डॉ. जनार्दन होटकर, उपप्राचार्य विवेक पाटील, परीक्षा विभाग प्रमुख डॉ. श्रीकांत चांदोरकर व सर्व प्राध्यापक उपस्थित होते. प्राचार्य डॉ. जनार्दन होटकर यांनी प्रास्ताविकात शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशामागील परिश्रम व प्रगतीचा आढावा घेतला. त्यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच, महाविद्यालयातील शिक्षकांनी मिळवलेल्या एकूण चार पेटंट्सबद्दल चेअरमन श्रीनिवास बेंडखळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर दुपारी पदवी प्रदान सोहळा पार पडला. यावेळी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाद्वारे प्रदान करण्यात आलेली पदवी प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

Exit mobile version