| पनवेल | प्रतिनिधी |
नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समिती आणि महाविकास आघाडीतर्फे 3 ऑगस्ट रोजी विधानसभेवर मोर्चा काढण्यात आला. पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात आला. या मोर्चाला उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांना घेऊन पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यापुढे शासनाला अडवणे शक्य होणार नाही, असे मोर्चा आपल्याला काढावे लागतील, नैनाविरोधी लढ्यात अधिक ताकदीने उतरु, असे प्रतिपादन माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केले.
नैना हे आपल्यासाठी घातक आहे, आपली जमीन फुकट घेतली जात आहे. यासाठी गेल्या दहा वर्षांपासून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून नैनाविरोधात रणकंदन केले जात आहे. नैनामुळे येथील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नैनाला विरोध केला जात आहे. नैनाविरोधात आपल्याला यापुढे आणखी ताकदवान व्हावे लागेल व आणखी तीव्र मोर्चे, आंदोलने काढावे लागतील. त्यामुळे आपल्या मागण्या शासनाला मान्य कराव्याच लागतील, असे बाळाराम पाटील यांनी बैठकीत सांगितले. लवकरच 8-10 दिवसात नैनाबाधित 200 हून अधिक गावाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात येणार आहे. त्यासाठी पुन्हा गाव दौरे आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दहा वर्षांपासून सुरू करण्यात आलेले नैनाविरोधातील आंदोलन कायम तेवत ठेवण्यात येणार आहे. त्यावेळी तीन ऑगस्ट रोजी आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी, ग्रामस्थ, नागरिक यांनी आंदोलन यशस्वी केल्याबद्दल त्यांचे बाळाराम पाटील यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले. यापुढेदेखील शेतकरी वाचवण्यासाठी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.