। चिपळूण । प्रतिनिधी ।
अर्थसंकल्प अधिवेशनात मंजूर केलेल्या पुल व रस्ते पुनर्बांधणीच्या कामांना मंजूर निधी अल्प प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे ठेकेदारांच्या येणार्या अडचणीबाबत उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याशी आमदार शेखर निकम यांनी खेड दौर्यात चर्चा केली.यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी पुरेसा निधी तातडीने उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली.
जुलै 2019 मध्ये झालेली तिवरे धरण फुटीची दुर्घटना तसेच निसर्ग वादळ, तौक्ते वादळ व सन जुलै 2021 मध्ये झालेल्या महापुरामुळे या विभागांअंतर्गत असणार्या रस्त्यांवरील पुलांची व रस्त्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. यामुळे या पुलांच्या व रस्त्यांच्या पुनर्बांधणीची कामे आपण अर्थसंकल्पांतर्गत मंजूर केली गेली मात्र या कामांना मंजूर निधी फारच अल्प प्रमाणात उपलब्ध झाला आहे.ही बाब आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या लक्षात आणून दिली.
या पुलांच्या व रस्त्यांच्या पुनर्बांधणीची कामे करताना ठेकेदारांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे याबाबत ठेकेदारांनी निकम यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या. पावसाळी हंगाम एक दोन महिन्यांवर येऊन ठेपला असून येत्या पावसाळ्यापुर्वी पुल व रस्त्यांच्या पुनर्बांधणीचे कामे तातडीने पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहेत. कामे पावसाळ्यापुर्वी न झाल्यास अनेक गावांचा संपर्क तुटणार आहे.