पावसाळ्यापूर्वीच्या कामांना सुरुवात

| सुधागड-पाली | वार्ताहर |

अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीमध्ये नगरपंचायततर्फे नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे. पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. परिणामी पावसाळ्यात गटारे व नाले तुंबण्याचा धोका नाही. पालीतील श्री बल्लाळेश्‍वर मंदिरापासून नालेसफाईला सुरुवात झालेली आहे. ठरलेल्या नियोजनाद्वारे येथील वेगवेगळ्या ठिकाणची नालेसफाई टप्प्या-टप्प्याने पूर्ण करण्यात येईल. नुकतेच लोकसभेची निवडणूक झाल्याने आता नालेसफाईच्या कामांना वेग आला आहे. पाणी बॉटल, प्लॅस्टिकच्या पिशव्या, घरगुती कचरा व गाळ यामुळे येथील बहुसंख्य ठिकठिकाणी नाले व गटारे तुंबली आहेत. नगरपंचायत चे सफाई कर्मचारी नियमित नालेसफाई करतात. पावसाळ्यापूर्वी होत असलेली नालेसफाई ही अत्याधुनिक यंत्र व जेसीबीच्या साह्याने अधिकची माणसे घेऊन करण्यात येत आहे. त्यामुळे या तुंबलेली गटारे व नाले पूर्णपणे साफ होती. तसेच नालेसफाई सुरुवात झाल्याने दुर्गंधी व घाण सर्व समस्या काही दिवसांत मार्गी लागणार आहेत.


नगरपंचायतीद्वारे कंत्राटी कामगार घेऊन नालेसफाई केली जात आहे. जेसीबी, ट्रॅक्टर व पारंपरिक साधने आदी साधनांचा वापर करून गटारे व नाल्यातील घाण, कचरा काढला जात आहे. याबरोबरच गटारे व नाल्याभोवती उगवलेले गवत, झाडे झुडपेदेखील काढली जात आहेत.

अनेक ठिकाणचे नाले व गटारांची कामे पूर्ण केली आहेत. तसेच मेअखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नगरपंचायत हद्दीतील नालेसफाईची कामे पूर्ण होतील. नालेसफाईची कामे चांगली व वेळेत व्हावीत यासाठी स्वतः लक्ष देत आहे. तसेच स्वच्छता सभापती व नगरसेवक देखील या कामांवर लक्ष ठेऊन आहेत. नागरिकांनी आवाहन आहे की त्यांनी प्लास्टिक बॉटल, पिशव्या व घरातील कचरा गटारे किंवा नाल्यात टाकू नये.

प्रणाली शेळके,
नगराध्यक्षा, पाली नगरपंचायत
Exit mobile version