बनावट नोटा छपाईसाठी कमिशन

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

काही दिवसांपूर्वी मुंबई मानखुर्द येथे बनावट नोटा सापडल्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचने चार जणांना अटक केली होती. त्यांच्याकडील चौकशीत त्यांना चिपळूण नागरी पतसंस्थेचा व्यवस्थापक अमित कासारचे नाव पुढे आले होते. कासारच्या चौकशीत या सर्व बनावट नोटांची छपाई रत्नागिरीतील एमआयडीसी येथे प्रसाद राणे आपल्या प्रिंटिंग प्रसेमध्ये करत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री प्रसाद राणेच्या घरी छापा टाकून त्याचे प्रिंटिंग मशीन, लेमीनेंट तसेच संगणक संच जप्त केले होते.

याच दरम्यान एक धक्कादायक माहिती पोलीसांच्या हाती लागली आहे. बनावट नोटा छपाई प्रकरणात प्रसाद राणे याने मार्च ते जुलै या कालावधीत एकूण 7 लाख 36 हजार रुपयांच्या 500, 200, 100 बनावट नोटांची छपाई केल्याची माहिती मुंबई क्राईम ब्रँचच्या तपासात पुढे आली आहे. तसेच, प्रसाद याला 4 लाखांच्या बनावट नोटांच्या छपाईसाठी इतर संशयित आरोपींकडून 1 लाख रुपयांचे कमिशन मिळत असल्यामुळे कमी कालावधीत श्रीमंत होण्यासाठी त्याने हा मार्ग अवलंबला होता.

Exit mobile version