400 गावकर्यांची शेतगाणी म्हणत भातलावणी
। मुरुड जंजिरा । सुधीर नाझरे ।
एकीकडे कोकणात शेतीचा कल कमी होत असताना रायगडमध्ये मुरुड तालुक्यात खारआंबोली गावात 400 गावकर्यांनी मंदिरासमोरील शेतीत भातलावणी पारंपरिक गीते बोलत पूर्ण केली अशी माहिती माजी सरपंच मनोज कामाने यांनी दिली.
गावागावातील मतभेद विसरून गावच्या शेतात हाक दिल्याबरोबर महिला व पुरुष सकाळी सात वाजल्यापासून कामाला येतात. पेरणीचे काम लवकर व्हावे म्हणून पारंपरिक गाणी बोलत कामात नाचत लावणी करतात. उद्देश असतो मतभेद विसरून आनंदात माणुसकीची मूल्य जपण्याचा. महिला पुरुषांना टोमणे मारतात तर पुरुष महिलांना मुंबईला नेतो असे टोमणे मारून सगळ्यांच्या चेहर्यावर हसू आणतात अशी परंपरा कोठे पाहायला मिळत नाही. त्यासाठी हे गाव प्रसिद्ध आहे
वाढत्या महागाईमुळे अनेक शेतकर्यांना वैयक्तिक शेतीवर खर्च करणे परवडत नाही. त्यातच शेतात काम करण्यासाठी मजूरही मिळत नाही. परंतु आता सामुदायिक शेती या संकल्पनेमुळे सर्व शेतकरी एकत्र येऊन राबत असल्याने मजुरांवर होणारा खर्च व इतर खर्च या सर्वाची बचत होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकर्यांवरील कामाचा ताणही कमी झाला आहे. सामुदायिक शेतीचा प्रयोग यशस्वी होत असल्याने शेतकर्यांना म्हणजेच ग्रामस्थांना उत्पन्नाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सध्या मजुरीने माणसे घेऊन शेतीची कामे जोरकसपणे सुरू आहेत.पाणथळ जमिनीवर तर अधिक वेगाने लावणीची कामे जोमाने सुरू आहेत असे चित्र दिसत आहे. खारआंबोलीतील भातशेतीची लागवड उशिरा केली जाते. कारण अनेक ठिकाणी अति पावसाने गावकर्यांचे राब घेऊन जातात. त्यामुळे गावची शेती लावून झाल्यावर उरलेले राब गावकर्यांना देण्यात येतात, असा सार्वजनिक हिताचा विचार हा गाव जपतो. या गावातील भातलागवड पाहण्यासाठी छायाचित्रकार व पर्यटकदेखील आवर्जून भेट देतात.