डोंगरी-मुंबईचा प्रवास होणार अधिक सुलभ

मुरुड-रेवदंडा मार्गावरील एसटी सेवा सुरु

| रेवदंडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील नागरिक, नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी तसेच मुंबईशी दैनंदिन संबंध असलेल्या प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुरुड आगाराने मंगळवारपासून मुरुड-रेवदंडामार्गे मुंबई (डोंगरी-चिचबंदर पूल) थेट बस सेवा सुरू केली असून या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मुरुड, रेवदंडा आणि परिसरातील नागरिकांकडून मुंबईसाठी थेट आणि नियमित बस सेवेची मागणी केली जात होती. अखेर या मागणीला प्रतिसाद देत एसटी महामंडळाने ही सेवा सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता अनेक ठिकाणी बस बदलण्याची किंवा खासगी वाहनांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होणार आहे. मुरुड आगारातून ही बस दररोज पहाटे 4.45 वाजता मुंबईकडे रवाना होणार असून मुंबईतील डोंगरी (चिचबंदर पूल) येथून परतीच्या प्रवासासाठी सायंकाळी 4.30 वाजता मुरुडकडे सुटणार आहे. या वेळापत्रकामुळे मुंबईत नोकरी, व्यवसाय, शिक्षण, वैद्यकीय उपचार तसेच विविध शासकीय आणि खासगी कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

विशेष म्हणजे गणेशोत्सव, दिवाळी, उन्हाळी सुट्ट्या आणि इतर सणासुदीच्या काळात गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही सेवा वरदान ठरणार आहे. याशिवाय मुरुड-जंजिरा, काशीद, नागाव, रेवदंडा या पर्यटन स्थळांकडे येणाऱ्या पर्यटकांनाही या बस सेवेचा मोठा लाभ मिळणार असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

या नव्या बस सेवेच्या प्रारंभामुळे मुरुड, रेवदंडा आणि परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात अशाच आणखी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.

आर्थिक, सामाजिक विकासाला चालना
मुंबईसारख्या महानगराशी थेट जोडली गेलेली ही बस सेवा केवळ प्रवासाची सोय नसून मुरुड तालुक्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासालाही चालना देणारी ठरणार आहे. व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तर नोकरदारांना वेळेत प्रवास करण्यासाठी ही सेवा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

प्रवाशांच्या मागणीचा विचार करून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या सेवेचा लाभ घ्यावा आणि एसटी महामंडळाला सहकार्य करावे.

– राहुल शिंदे, मुरुड आगार प्रमुख

Exit mobile version