रसायनीतील स्पर्धंकांचे जम्प रोप स्पर्धेत सुयश

। रसायनी । वार्ताहर ।
रायगड जिल्हा आणि पनवेल शहर जम्प रोप असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दुसर्‍या जिल्हास्तर जम्प रोप अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन स्मिता पनवेलकर (अध्यक्षा जम्प रोप असोसिएशन पनवेल) व प्रतिक कारंडे (आयोजक/सचिव जम्प रोप असोसिएशन पनवेल) यांच्यावतीने समाज मंदिर हॉल, नवीन पनवेल येथे करण्यात आले होते. यामध्ये रायगड जिल्हा आणि पनवेल शहरमधून एकूण 180 खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धा उत्साहात पार पडली.

या स्पर्धेत निलेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सूकापूर शाखेने वर्षी प्रथम पारितोषिक, तर प्रशांत गांगर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आकुर्ली शाखेने द्वितीय, तर मनीष पनवेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पनवेल संघाने तृतीय पारितोषिक आणि संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी संघाने चतुर्थ पारितोषिक पटकावले. यात रसायनी येथील संजय पाटील यांच्या विद्यार्थ्यांनी चार सुवर्णपदक, दोन रौप्य व दोन कांस्यपदक पटकाविली. यात विनायक पाटील, भावार्थ धुमाळ, अनुसया कदम व कादंबरी चौधरी यांनी सुवर्ण, ऋषभ मोरे व आर्यन दिलोड यांनी रौप्य, तर स्वरूप पाटील, ज्ञानेश्‍वर कदम यांनी कांस्यपदक पटकावले.

दरम्यान, सर्व विजेत्या स्पर्धकांची 27/28 ऑगस्ट रोजी नंदुरबार येथे होणार्‍या राज्यस्तरीय जम्प रोप स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. यावेळी युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष आणि जम्प रोप असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version