| मुकुंद | वार्ताहर |
माथेरानमध्ये ई-रिक्षाला समर्थन देणार्या माजी नगरसेवक शिवाजी शिंदेंच्या वाहनाला दस्तुरी नाक्यावर पंक्चर करून त्यांचा घात करण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तींकडून फसला आहे. याबाबत शिवाजी शिंदेंनी माथेरान पोलीस निरीक्षक शेखर लव्हे त्याचप्रमाणे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, विशेष पोलीस महासंचालक कोकण परिक्षेत्र, जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत, अधीक्षक माथेरान आणि नगरपालिका प्रशासक माथेरान यांना निवेदन देऊन संबंधीत अज्ञात व्यक्ती आणि जो कोणी मुख्य सूत्रधार असेल त्यांच्यावर कारवाई करावी, या आशयाचे निवेदन दि.31 डिसेंबर रोजी सादर केले आहे.
शिवाजी शिंदेंनी निवेदनात म्हटले आहे की, आयशर कंपनीचा टेंपो माथेरानच्या दस्तुरी नाक्यावर दि.23 डिसेंबर रोजी पार्क करण्यात आला होता. माझा भाजीपाल्याचा व्यवसाय असल्याने मी दि.29 रोजी मध्यरात्री 02:40 च्या दरम्यान वाशी मुंबई इथे भाजीपाला खरेदीसाठी निघालो होतो. परंतु टेंपो जवळ गेलो असता टेंपोच्या उजव्या बाजूकडील मागच्या टायरला धारदार हत्याराचा वापर करून टायर पंक्चर करण्यात आला होता. तर नुकताच माझ्या ब्रिझा गाडीचे सुध्दा नुकसान केलेले आहे. यामागे जो कोणी मुख्य सूत्रधार असेल त्यांच्यावर कारवाई करावी असे माजी नगरसेवक शिवाजी शिंदेंनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक शेखर लव्हे आणि अन्य अधिकारी वर्ग याबाबत काय पाऊले उचलणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.