। बोर्ली पंचतन । वार्ताहर ।
महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवतीना इतर कोणताही विभाग, संस्था अथवा महामंडळा मार्फत लाभ मिळत नाही. त्यांना संगणक कौशल्यात विकसित व प्रशिक्षित बनण्यासाठी आवश्यक कौशल्य, ज्ञान आणि पाठबळ देऊन त्यांना सक्षम करणे आणि उद्योगाभिमुख रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन स्वावलंबनाला चालना देण्याच्या उद्देशान अमृत आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत एमकेसीएलमार्फत राबविण्यात येणार्या काही निवडक प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना निवड झाल्यावर प्रशिक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे. अमृत तर्फे प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्या प्रशिक्षणाचं शुल्क अमृत संस्थेमार्फत एमकेसीएल संस्थेस परस्पर दिले जाणार आहे.