| उरण । वार्ताहर ।
उरण- चाकण- शिकरापुर एलपीजी पाईपलाईन व एचपीसीएल उरण भेंडखळ कंपनीचे महाप्रबंधक राजेंद्र टिकेकर यांच्या नेतृत्वाखाली उरण पिरवाडी चौपाटीवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दिड व पाच दिवसांच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी पिरवाडी चौपाटीवर विखुरलेला केरकचरा कामगारांनी गोळा करुन त्यांची योग्य जागेवर विल्हेवाट लावण्यात आली.
उरण- चाकण- शिकरापुर एलपीजी पाईपलाईन, एचपीसीएल कंपनीच्यावतीने राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचा अंतर्गत गणेशोत्सवाचे औचित्य साधून उरण चौपाटीवर राबविण्यात आलेल्या अभियानात कंपनीचे महाप्रबंधक राजेंद्र टिकेकर, मुख्य प्रबंधक रोहित सी, वरिष्ठ प्रबंधक राहुल चव्हाण, प्रबंधक हेमंत कुमार, सहाय्यक प्रबंधक शानू गुप्ता, अधिकारी रोशन मिश्र, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी ठाकूर तसेच कामगार सहभागी झाले होते. स्वच्छता ही सेवा अभियान, हे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे अभियान आहे, ज्याचा उद्देश रस्ते आणि पायाभूत सुविधा स्वच्छ ठेवणे आणि झाडे लावणे असा असल्याचे कंपनीचे अधिकारी यांनी पटवून दिले.