| माणगाव । वार्ताहर ।
मंडणगड तालुका कुणबी सेवा संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या गौरीगणेश जाखडी नृत्य स्पर्धेत पेणजाई नृत्य कलापथक पेण तर्फे तळे तालुका माणगाव यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. संभूराजू तुरेवाले सांस्कृतिक उन्नती मंडळ व ओम शिवशंभो उन्नती कला मंडळ रायगड रत्नागिरी यांच्या विद्यमाने सदर स्पर्धा कुणबी भवनचा राजा गणेशोत्सवात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पाच नृत्य कलापथकांनी सहभाग घेतला होता.
दुर्मिळ होत जाणारी जाखडी नृत्यकला जतन व संवर्धन करण्याचे काम पेणजाई नृत्यकला पथक करीत आहे. पारंपारिकता, अध्यात्मिकता व आधुनिक पद्धतीचा साज यांचा सुंदर मिलाफ घालून नृत्यकला सादर केली जाते. शाहीर भागोजी पोटले, शाहीर सदानंद अधिकारी, नृत्यकार घनश्याम मोंडे, सहकलाकार , ढोलकी वादक तुकाराम पोटले , सहदेव पोटले यांनी सुंदर सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. शाहीर शिवराम पोटले, शाहीर पोपट पोटले, शाहीर गजानन पोटले ,सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद अधिकारी, नामदेव ताम्हणकर, दगडू पाखड, कलगीतुरा मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ टेंभे आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.