| तळा । वार्ताहर ।
मुंबई, ठाणे उपनगरातुन चाकरमानी आणि गणेशभक्त गणेश उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गावी आले होते. परंतु तळा शहर आणि ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सातत्याने सुरू होता. विजेच्या वारंवार खंडित होण्याने नागरिक हैराण झाले होते. विजेच्या अनियमिततेमुळे त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत होता. पाण्याची टंचाई भासू लागली याबाबतीत एकता आघाडी आणि शेतकरी संघटनेने देखील लेखी पत्र, संवाद बैठकीचे आयोजन केले होते. त्याची दखल येथील नवनिर्वाचित उपअभियंता घावरे यांनी घेतली आणि मुसळधार पावसाने येथील परिसरातील खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणच्या कर्मचार्यांनी अथक परिश्रमाने सुरळीत केला. गौरी गणपती उत्सवाच्या दरम्यान सुरळीत वीज पुरवठा सुरू ठेवला त्या बद्दल तळेवसियांनी महावितरणचे आभार मानले आहेत. गेले आठ दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे तळा तालुक्यातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे जनतेची गैरसोय झाली. मात्र, भरपावसात अथक परिश्रमाने येथील महावितरणच्या कर्मचार्यांनी वीजपुरवठा सुरळीत करून लोकांना दिलासा दिला. मुसळधार पाऊस आणि वादळी वार्यामुळे परिसरातील तळा शहर, वृंदावन, तळेगाव ऊसर, बेलघर, गिरणे, सोनसडे, मांदाड आदी गावांमध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा करणार्या खांबांवरील तारांवर झाडे पडल्याने तारा तुटल्या होत्या.परिणामी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, येथील वीज कर्मचार्यांनी मुसळधार पावसातही विविध प्रकारे प्रयत्न करून वीजपुरवठ्यात आलेले अडथळे दूर करून परिसरातील वीजपुरवठा सुरळीत केला याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.