दोषींना तत्काळ अटक करण्याची मागणी
| महाड | प्रतिनिधी |
भोर-नसरापूर परिसरात एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष कृत्याचा निषेध करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दोषींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत महाड प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी द. उपजिल्हाप्रमुख चेतन (बंटी) पोटफोडे, विधानसभा संघटक सुभाष मोरे, तालुका प्रमुख आशिष फळसकर, उपतालुका प्रमुख किशोर सर्कले, शहर प्रमुख मंगेश देवरुखकर, महिला शहर प्रमुख तृप्ती रत्नपारखी, संपर्क प्रमुख नानू तांबट, युवासेना विभाग अधिकारी कृणाल सर्कले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.







