स्वर्गीय माणिक जगताप यांना साश्रू नयनांनी अभिवादन
। महाड । प्रतिनिधी ।
उत्तम कुशल राजकिय नेता व कलाकार असणारे कोकण नव्हे तर समस्त महाराष्ट्रात व राष्ट्रीय पटलावर आपले नाव कोरणारा नेता माणिक जगताप आपला प्रवास अर्धवट सोडून गेला. विरोधकांवरही अशी वेळ येऊ नये. कोरोना महामारी, महापूर आणि माणिकरावांचे निधन असे एका पाठोपाठ एक येणारी बिकट परिस्थिती सुधारायला वेळ लागेल. परंतु वडीलांच्या निधनाचे दुःखाचे डोंगर समोर असताना महाडकर जनतेसाठी ज्या तळमळीने नगराध्यक्षा स्नेहल जगताप बाहेर पडल्या त्यांच्या कार्याला सलाम करीत संपुर्ण रायगड व राज्यातील काँग्रेसची ताकद त्यांच्या पाठीशी उभी करू, असे आश्वासन रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आर.सी. घरत यांनी दिले. महाडचे माजी आमदार राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष स्व. माणिकराव जगताप यांची शोकसभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित केली होती. त्यावेळी साश्रू नयनांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना घरत बोलत होते.
या प्रसंगी शोकाकुल युवा नेते हनुमंत जगताप, नगराध्यक्षा स्नेहल जगताप- कामत, त्यांचे पती स्वानंद कामत, संजय जगताप, सुहास देशमुख,भाजपचे नेते प्रकाश दरेकर, भाजपचे महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी, शिवसेनेचे राजिप सदस्य मनोज काळीजकर, माजी जिप सदस्य विजय सावंत, काँग्रेसच्या महिला नेत्या श्रद्धा ठाकूर, अॅड. प्रविण ठाकूर, महेंद्र घरत, धनंजय देशमुख, शिवसेनेचे नेते अॅड. राजीव साबळे, परशुराम म्हात्रे, प्रथमेश पाटील, अॅड. संध्या पवार-जाधव, माजी सभापती संजय चिखले, नगरसेवक संदीप जाधव, पत्रकार श्रीकृष्ण बाळ यांनी साश्रु नयनांनी आपल्या आठवणींना उजाळा देत माणिकराव यांना श्रद्धांजली अर्पण केली.
सुरुवातीस प्रास्ताविकात सुधीर शेठ यांनी माणिकरावांचा जीवनपट उलगडून त्यांच्या आठवणी ताज्या केल्या. प्रकाश दरेकर यांनी राजकिय क्षितीजावर गारूड घालणारे व्यक्तीमत्व माणिकरावाचे हात आज महापूराच्या संकटात मदतीसाठी नाहीत. फायद्या तोट्याची पर्वा न करता बेधडक जनतेच्या प्रश्नासाठी राजकिय निर्णय घेणारा नेता अशा शब्दात गौरव केला.आंबेडकरी नेते जगदीश पवार यांनी माणिकरावांचे आंबेडकरी चळवळीसाठी योगदान कधीही न विसरणारे असल्याचे सांगितले.भाजपचे तालुका अध्यक्ष जयवंत दळवी यांनी मैत्री कशी करावी व कार्यकर्त्या पाठिशी कसे राहावे हे माणिकरावांकडून शिकण्यासारखे होते, अशा शब्दात त्यांना आदरांजली वाहिली.
नगरसेवक संदीप जाधव यांनी लाखाचा पोशिंदा गेल्याची खंत व्यकत केलीतर राजिप सदस्य मनोज काळीजकर यांनी प्रशासकिय दबदबा व हुशार व्यक्तीमत्वाला महाडकर गमावून बसले असल्याचे सांगितले.शेवटी सामुदायिकरित्या उभे राहून माणिकरावांना श्रद्धाजली अर्पण करण्यात आली. त्यांचे दशक्रिया विधी दि. 4 आँगस्ट रोजी हरीहरेश्वर व उत्तरकार्य दि. 7 ऑगस्ट रोजी कॅप्टन निवासस्थानी होणार आहेत.