। मुरुड । नितीन शेडगे ।
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुरुड शहरात केनेपाखाडीतील संदेश जनार्दन केने यांच्या नारळ सुपारी बागायतीमध्ये अनेक वर्षांपासून एक साडेपाच ते सहा फूट उंचीची दगडी शिळा पडलेली होती, परंतु त्याचे महत्व माहिती नसल्याने ती दुर्लक्षित शिळा तशीच पडून होती. त्यावरील कोरीव काम खालच्या बाजूस असल्याने लक्षात येत नव्हते. त्या शिळेचा उपयोग करण्यासाठी त्यांनी ती शिळा उभी केली असता त्यावर काही चित्र कोरल्याचे आढळले. ती चित्रे म्हणजे वराह रूप घेतलेले विष्णूचा अवतार आहे, समजून त्या शिळेची पूजा अर्चाही सुरु केली. परंतु एक दिवस संदेश यांनी मुरुड मधील इतिहास अभ्यासक अनिकेत अशोक पाटील यांना ती शिळा दाखवली. त्यांनी त्या शिळेचे निरीक्षण केले असता शिळेच्या वर चंद्र, सूर्य व कलश तसेच खालच्या बाजूस एक गाढवाचे चित्र व एका स्त्रीचे चित्र कोरलेले आढळले. मधल्या भागाचे शिलालेख व चित्र अस्पष्ट आहेत. मात्र ती गधेगळ असल्याचे अनिकेत यांनी सांगितले,

गधा म्हणजे गाढव व गळ म्हणजे दगड. मुरुडमध्ये सिद्धी संस्थानच्या आधीही येथे लोकसंस्कृती नांदत होती. त्याआधी कोकणामध्ये शिलाहारांनी राज्य केले. त्यानंतर काही काळ यादवांचे राज्य होते. गधेगळ ही शिलाहार काळात सुरु झालेली प्रथा इस्लामी राजवटीपर्यंत सुरु होती. गधेगळ म्हणजे आयताकृती दगडी शिळेवर कोरलेली राजआज्ञा म्हणजे एकप्रकारे दानपत्र होते. राजांनी एखाद्यास जमीन किंवा अन्य प्रकारचे दान दिल्यास त्या सोबत गधेगळ दिली जायची, असे इतिहास अभ्यासकांचे म्हणणे आहे. प्रजेनी राजआज्ञा मोडली तर त्याची गय केली जाणार नाही, हे दर्शवण्यासाठी गधेगळ कोरली जात होती. दिलेल्या दानाचा दुरुपयोग केल्यास, नियम मोडल्यास काय शिक्षा होईल, हे सांगणारी शिल्पांकित केलेली धमकी वजा इशारा किंवा शिवी असते.
दान देणार्या राजाची कीर्ती चंद्र, सूर्य असेपर्यंत कायम राहील, याचे प्रतीक म्हणून गधेगळांच्यावर चंद्र , सूर्य कोरलेले आहे, गधेगळावरील शिलालेख संस्कृत, पारशी किंवा मराठी भाषेत आढळतो, अशाच प्रकारचे गधेगळ अलिबाग तालुक्यातील आक्षी येथेही आहे. हा गधेगळ मुरुडमधील या बागायतीमध्ये कसा आला, हा संशोधनाचा विषय आहे, परंतु संदेश केने यांच्या मामाची वाडी या पर्यटकांसाठी तयार केलेल्या बागायतीमध्ये पर्यटक याचा आनंद लुटत आहेत. मागील काही वर्षांपूर्वी मुरुड तालुक्यातील भोईघर येथे शिलाहार काळातील ताम्रपट मिळाला होता. तसेच मुरुडमधील क्षेत्रपाल परिसरातही दोन पुरातन वीरगळ आहेत. मुरुडमध्ये शासनाने इतिहास संशोधकांना बोलावून ऐतिहासिक स्थळांची पाहणी करावी, अशी मागणी मुरुड इतिहास अभ्यासक अनिकेत पाटील यांनी केली आहे.