| मुंबई | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावरचा विश्वासदर्शक ठराव सोमवारी (दि. 9) विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाला. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या अंतिम दिवशी सोमवारी (दि.9) दुपारी हा ठराव मांडण्यात आला. शिवसेनेचे आमदार उदय सामंत, भाजपाचे आमदार संजय कुटे, रवी राणा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी हा प्रस्ताव सादर केला.
प्रस्ताव विधानसभेत आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं. दरम्यान, महायुतीकडे मोठ्या प्रमाणात आमदारांची संख्या असल्यामुळं सरकारचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतानं मंजूर झाला आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्ण यांच अभिभाषण विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात झाले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उसभापती नीलम गोर्हे यांच्यासह विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार उपस्थित होते. राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात सरकारने केलेल्या विकासकामांची आणि योजनांची माहिती दिली. यावेळी सत्ताधारी आमदारांनी बाके वाजवून घोषणाबाजी केल्या.
राज्यपालांच्या अभिभाषणावरचा आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव भाजपा आमदार पराग अळवनी यांनी विधानसभेत मांडला. विधानसभेत दिवंगत उद्योगपती रतन नवल टाटा यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच दिवंगत बाबा सिद्दीकी, मधुकर पिचड, सीताराम दळवी, रोहिदास पाटील आदी विधानसभा सदस्यांना सभागृहातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.
कोणाकडे किती आमदार?
सत्ताधारी महायुतीमधील भाजपकडे 132, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 41 आमदार आहेत. विरोधी महाविकास आघाडीतील काँग्रेसकडे 16, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 20 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडं 10 जागा आहेत.