स्वतंत्र विदर्भासाठी घोषणाबाजी
| वर्धा | प्रतिनिधी |
इथं आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज पहिला दिवस होता. मात्र हा पहिलाच दिवस विदर्भवाद्यांनी घातलेल्या गोंधळामुळे चर्चेत आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी हा गोंधळ झाला. मराठी साहित्य संमेलनाचे उद्धघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांचे भाषण सुरू असतानाच विदर्भवाद्यांनी वेगळा विदर्भच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. या आंदोलकांची दखल मुख्यमंत्री शिंदेंनीही आपल्या भाषणात घेतली.
एकनाथ शिंदे म्हणाले, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ. हे साहित्य संमेलन आहे. आपले विषय मांडायला वेगवेगळे व्यासपीठ आहे. या मान्यवरांचे स्वागत आपण केले पाहिजे. सरकारची दारे 24 तास उघडी आहेत. कुणाचाही अनादर करण्याचा आमचा नाही. आज हे साहित्यिकांचे राज्य आहे, कृपया तुम्ही गोंधळ घालू नये.असे आवाहनही त्यांनी केले.
गोंधळ करणार्या या आंदोलकांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरली. विदर्भावर उर्जा, पाणी, निधी प्रत्येक गोष्टीत अन्याय होत आहे, असं आंदोलकांचं म्हणणं होतं. दरम्यान, गोंधळ घालणार्या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
राजकारण्याचं काय काम?
साहित्य राजकारण्यांचं काय काम? या ठिकाणी साहित्यिकांचं राज्य आहे. एक वेगळा आनंद या ठिकाणी ओसंडून वाहतो आहे तिथे आम्ही राजकारणी काय करणार? असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. समाजाला दिशा देणारे आणि बळ देणारे सगळे साहित्यिक हे मुळात सामाजिक नेतेच असतात. दुसर्याचं दुःख ते आपलं दुःख असं समजून साहित्यिक काम करत असतात. सामाजिक तमळमळीतूनच साहित्यिकांचं साहित्य जन्माला येत असतं असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.