दोन्ही गटांत परस्परविरोधी दावे
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबतचा तिढा अधिकच वाढताना दिसत आहे. शरद पवार यांच्या गटाकडून विलिनीकरणासंदर्भात चर्चा झाल्याचा दावा केला जात असताना, अजित पवार गटाकडील नेत्यांकडून हे दावे फेटाळून लावण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांसोबत बंद दाराआड काही मिनिटांची चर्चा झाल्याचे समजते. या भेटीमागचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले, तरी राज्यातील बदललेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे महत्त्वाने पाहिले जात आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली असून, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार गटाकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी झालेली ही पहिलीच भेट ठरली आहे. राष्ट्रवादीचे पुढील नेतृत्व सुनेत्रा पवार यांच्याकडे जाणार असल्याची चर्चा असतानाच, दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या सर्व राजकीय स्थितीबाबत प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीतील नेत्यांशी चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. तसेच सुनेत्रा पवार लवकरच दिल्ली दौऱ्यावर जाण्याची शक्यता असून, त्यादेखील पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. एकूणच, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत सध्या स्पष्ट चित्र नसून, राजकीय वर्तुळात अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे.







