महागाईविरोधात काँग्रेस आक्रमक;भाजप कार्यालयासमोर निदर्शने

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरात झालेली वाढ, जीवनावश्यक वस्तूंच्या भरमसाठ दरवाढीविरोधात शुक्रवारी अलिबाग येथे रायगड जिल्हा काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी दरवाढ व इतर मुद्द्यांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटका सामान्य जनतेला बसतो आहे. सर्वच वस्तूंवर जीएसटी लावल्याने सामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. सैन्य दलातील अग्निपथ योजनेमुळे भारतीय युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

अलिबाग येथील भाजप कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात काँग्रेस जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र ठाकूर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष श्रद्धा ठाकूर, अलिबाग तालुकाध्यक्ष योगेश मगर, अनंत गोंधळी, प्रथमेश पाटील, कविता ठाकूर, रवींद्र ठाकूर, जगदीश कवळे, मुजफ्फर चौधरी, शैलेश घरत आदींसह काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

Exit mobile version