| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पेट्रोल, डिझेल, गॅस यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत. याचा सामान्य नागरिकांना नाहक त्रास होत आहे. वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसने सरकारविरोधात बिगुल वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसतर्फे गुरुवारी (ता. 31) सकाळी 11 वाजता ढोल-ताशे वाजवून आंदोलन करण्यात येणार असल्याचे, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.
भाजपने निर्माण केलेली महागाई फक्त श्रीमंतांनाच फायदा करून देत आहे. देशातील जनतेला हळूहळू मारण्याचे काम सरकार करीत आहे. यामुळे सर्वत्र नाराजी पसरली आहे. सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार सरचिटणीस आणि प्रभारींनी बैठक घेतली आहे. यावेळी ‘महागाईमुक्त भारत अभियान’ तीन टप्प्यात राबविण्याचा निर्णय घेतल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले.
मे 2014 मध्ये पेट्रोलवर 9.20 रुपये आणि डिझेलवर 3.46 रुपये अबकारी होते. परंतु, भाजप सरकारने आठ वर्षांत डिझेलवरील उत्पादन शुल्कात 531 टक्के व पेट्रोलवर 203 टक्के वाढ केली आहे. मोदी सरकारने आठ वर्षांत जनतेच्या खिशातून 26 लाख कोटी लुटले आहेत. हा आरोप नसून सरकारी आकडा आहे, असेही रणदीप सुरजेवाला म्हणाले. यूपीएमधील मनमोहन सिंग सरकारच्या काळात 2011-12 मध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील सबसिडी एक लाख 42 हजार कोटी रुपये होती. नंतर ती वाढवून सुमारे दीड लाख रुपये करण्यात आली. यातून गरिबांना दिलासा मिळाला होता. मात्र, 2016 मध्ये मोदी सरकारने सबसिडी 27,000 कोटी केली होती. आता ती केवळ 11,000 कोटी आहे. हे देखील लवकरच संपणार आहे, असेही रणदीप सुरजेवाला म्हणाले.
गॅसची किंमत दुपटीने वाढली
आठ वर्षांपूर्वी गॅस सिलिंडरची किंमत 410 रुपये होती. आज त्याची किंमत हजारच्या वर गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसची किंमत कमी झाली असताना देशात गॅसची किंमत दुपटीने वाढली आहे. 2014 मध्ये सीएनजी 35 रुपये होता तो आता 80 रुपये किलो झाला आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. 31) ‘महागाईमुक्त भारत अभियान’ राबविण्यात येणार आहे, असेही रणदीप सुरजेवाला म्हणाले.
दुसरा व तिसरा टप्पा या दिवशी
‘महागाईमुक्त भारत अभियाना’चा दुसरा टप्पा 2 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान असेल. यामध्ये धार्मिक, सामाजिक संघटनांनाही सोबत घेतले जाणार आहे. महागाईमुक्त भारतासाठी जिल्हास्तरावर धरणे व मोर्चा काढण्यात येणार आहे. 7 एप्रिल रोजी प्रत्येक राज्यातील काँग्रेस कार्यालयांवर सर्व संघटनांसह महागाईमुक्त मोर्चा आणि आंदोलन करण्यात येणार आहे.