। कोलाड । प्रतिनिधी ।
महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासामध्ये वीरगळांचे महत्व वैशिष्ट्यपूर्ण समजले जाते. वेगवेगळ्या राजवटींमध्ये सत्तासंघर्षातून बलिदान दिलेल्या वीरांचे वीरगळ महाराष्ट्रभर पाहायला मिळतात. माणगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये उत्तर कोकणचे शिलाहार घराणे आणि यादवांमधील संघर्षातील वीरांची स्मारके दृष्टीस पडतात.
रातवड हे माणगाव तालुक्यातील उत्तरेकडील शेवटचे गाव आहे. याच गावात महामार्गालगत अनेक वर्षांपासून वैविध्यपूर्ण वीरगळ उध्वस्त अवस्थेत होत्या. यावेळी माणगड, सूरगड येथे गडसंवर्धन करणार्या दुर्गवीर प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या वीरगळांचे संवर्धन करण्याचे ठरवले आणि दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेने रातवड ग्रामस्थांच्या संमतीने या ठिकाणी जांभा दगडांमधील चौथरा आणि त्यावर टिकाऊ असे छप्पर बनवण्यात आले.
तसेच, दुर्गवीर प्रतिष्ठान आणि सोबतीला सह्याद्रीचे शिलेदार यांची साथ मिळाली. आधी बांधलेल्या चौथर्यावर सर्व वीरगळ व्यवस्थित ठेवण्यात आल्या. उपस्थित दुर्गवीर, शिलेदार, शिवशंभू प्रतिष्ठानचे मावळे आणि त्याच वेळी उपस्थित असलेले महामार्ग अधिकारी यांना वीरगळांबद्दल माहिती तसेच स्मारक बांधण्याचे प्रयोजन दुर्गवीर प्रतिष्ठान सल्लागार रामजी कदम आणि राजधानी रायगड अभ्यासक मोहनराव फराडे यांनी सांगितले.
यावेळी वीरगळ संवर्धन मोहिमेत दुर्गवीर प्रतिष्ठानचे सदस्य विठ्ठल केंबळे, प्रमोद डोंगरे, महेंद्र पार्टे, किशोर सावरकर, अजित लाखाडे, सुयोग पाटील, कल्पेश सागवेकर, संकेत गोरिवले, श्रेया मालांडकर, आम्ही सह्याद्रीचे शिलेदार संस्थेचे प्रफुल्ल करकरे, सिध्दांत शिंदे, प्रतीक भोनकर रातवडचे ग्रामस्थ आणि उपसरपंच सतीश पवार, प्रणित कदम, किरण गायकर तसेच शिवशंभू प्रतिष्ठान रोहाचे प्रशांत बर्डे आणि सहकारी उपस्थित होते.