प्रशासनाकडून 20 कोटी निधी मंजुर; पर्यटन व्यवसायालाही चालना मिळणार
। दिघी । प्रतिनिधी ।
निसर्गाची जोड व उत्पादनाला लागणारे पोषक वातावरण असे मिळणारे महाराष्ट्र राज्यातील सुपारी संशोधन केंद्र रायगडमधील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे होत आहे. या सुपारी केंद्राला एकूण 20 कोटी निधीची मंजुरी प्रशासनाकडून मिळाल्याने केंद्र विस्तारीकरण झाल्यानंतर स्थानिक शेतकरी व बागायतदारांना उत्पन्नवाढीबरोबरच उद्योगासाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा मिळणार आहेत. दिवेआगरच्या पर्यटन व्यवसायालाही यामुळे चालना मिळणार आहे.
कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत असणारे सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन शहरातील 43 गुंठे जमिनीवर पसरले असून, या केंद्राची स्थापना जून 1953 साली झाली आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी या केंद्राला भेट देत असत. मात्र, अपुर्या जागेमुळे येथील सुपारी व त्यातील आंतरपिके संशोधनाला वाव मिळत नव्हता. विशेष म्हणजे, सन 2003 पासून जागेचा शोध सुरु होता.
श्रीवर्धन येथील केंद्रासाठी विस्तारित सुपारी संशोधन केंद्रासाठी दिवेआगर येथील जागा प्रस्तावित होती. मात्र, जागेबाबत स्थानिक वाद असल्याने तेथे संशोधन केंद्र बनवण्याबाबत साशंकता निर्माण झाली. मागील दिवसात ही समस्या सुटल्याने दिवेआगर येथे दोन हेक्टर जागेवर केंद्राला उभारणी करण्यात येणार मार्ग मोकळा झाला आहे. सुरुवातीला 5 कोटी 64 लाख, तर आता 14 कोटी 71 लाख असा 20 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आता दिवेआगर परिसराचे हवामान आणि जमीन विचारात घेऊन अधिक उत्पादन व आर्थिक नफा मिळवून देणार्या पिकाची आंतरपीक पद्धती विकसित करण्यासाठी संशोधन कार्य केले जाणार आहे.
वैशिष्ट्यपूर्ण पीक
नारळ, सुपारी ही महत्त्वाची पिके व त्यावर संशोधन केले जाते. याशिवाय जायफळ, दालचिन व काळीमिरी तसेच अननस, हळद, आले आणि सुरण यांसारखी आंतरपिके यांवर प्रयोग केले जातात. येथे सुपारीचे रोपटे, नारळाची रोपे यांची विक्री शासकीय दराने होते. श्रीवर्धनी प्रकारच्या सुपारीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
श्रीवर्धनलाच हे सुपारी केंद्र का?
समुद्र किनारपट्टी भागात सुपारी हे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. या भागातील स्थानिक सुपारी जातींमधून ‘श्रीवर्धनी रोटा’ पद्धत ही जात 1998 मध्ये केंद्राकडून विकसित केली गेली. तिच्यात पांढर्या गर्याचे प्रमाण अधिक असून मऊ असते. संशोधनास पोषक वातावरण व सुपीक जमीन यांमुळे संशोधन केंद्र श्रीवर्धन येथे 1953 साली स्थापन केले गेले. सुपारी पिकांवरील विविध रोग, कोकणातील बागांचे सर्वेक्षण करून विविध जातींचा संग्रह व अभ्यास करणे, अधिक उत्पन्न देणार्या जातींचा अभ्यास करणे तसेच रोपे शेतकर्यांना पुरवणे ही प्रमुख उद्दिष्ट आहेत.