प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जीविताला धोका
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात अवजड आणि ओव्हरलोड डंपरने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कधी रस्त्यावर सांडणारी खडी आणि उडणारा धुरळा, तर कधी बेभान वेगामुळे होणारे अपघातामुळे स्थानिक नागरिक, भाविक आणि व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पालीकरांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला असून, संतापाची लाट उसळली आहे.
रविवारी (दि. 26) मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या एका डंपरमधून मोठ्या प्रमाणावर बारीक खडीचा भुगा (ग्रीट) सांडत होता. यामुळे संपूर्ण परिसरात धुळीचे लोट उसळले होते, ज्यामुळे पादचारी आणि दुचाकीस्वारांना धुळीने आंघोळ करण्याची वेळ आली. समाज माध्यमांवर हा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर फिरत होता. गेल्या आठवड्यात ग.बा. वडेर हायस्कूलजवळही अशीच घटना घडली होती. रस्त्यावर सांडलेल्या खडीमुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून, शाळकरी विद्यार्थ्यांना चालणेही कठीण झाले आहे.
केवळ धूळच नव्हे, तर डंपरच्या बेजबाबदार वाहतुकीमुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. सोमवारी (दि.13) रात्री एका बेभान डंपरने आगरआळी जवळ उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. सुदैवाने त्या ठिकाणी कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. यापूर्वी जानेवारीत ग्रामविकास अधिकारी सचिन केंद्रे आणि फेब्रुवारीत महावितरणचे कर्मचारी अनंत सोनवणे हे देखील डंपरमुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले होते.
प्रशासकीय अनास्था
पाली नगरपंचायतीने 26 फेब्रुवारी रोजी शहरातून सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत अवजड वाहतूक बंद करण्याचा ठराव मंजूर केला होता. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुढील कार्यवाही न झाल्याने हा ठराव केवळ कागदावरच राहिला आहे. त्यातच गेल्या 15 वर्षांपासून रखडलेला 'बायपास' मार्ग पूर्ण न झाल्याने सर्व अवजड वाहतूक शहराच्या अरुंद रस्त्यावरून सुरू आहे.
या ओव्हरलोड डंपर वाहतुकीमुळे शाळकरी विद्यार्थी, पालक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. अवजड वाहतूक थांबावी यासाठी नगरपंचायतीला निवेदन दिले होते, मात्र कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाने ही ओव्हरलोड वाहतूक तातडीने बंद करावी, अन्यथा सामान्य पालीकर रस्त्यावर उतरतील.
श्रीकांत ठोंबरे







