कर्जतमध्ये काँग्रेसकडून मोर्चे बांधणी

उल्हासराव देशमुख उतरणार मैदानात

| खोपोली | प्रतिनिधी |

कर्जत विधानसभा मतदार संघात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार महेंद्र थोरवे, शिवसेनेचे नितीन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. विशेषतः हे तीनही उमेदवार कर्जतमधील आहेत.अशात यावेळी खालापूर व खोपोलीला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.

1995 मध्ये थोड्या मतांनी पराभूत झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले उल्हासराव देशमुख यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे. तशा प्रकारे रितसर उमेदवारी मागणीचा अर्ज त्यांनी सोमवारी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या व निवडणूक समितीकडे केला आहे. उल्हासराव देशमुख यांना खोपोली शहर काँग्रेस, खालापूर तालुका काँग्रेस व कर्जत तालुका काँग्रेस कमिटीकडून सर्वानुमते सहमती दर्शविण्यात आली आहे. अत्यंत हुशार, कोणताही आरोप किंवा डाग नसलेला क्लिन चेहऱ्याचा उमेदवार म्हणून उल्हासराव देशमुख यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाल्यास अन्य राजकीय पक्षांकडूनही त्यांना मोठा पाठींबा मिळणार असल्याचे शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आघाडीच्या संयुक्त बैठकीत उल्हासराव देशमुख यांच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यात येईल व प्रदेश काँग्रेसकडून पूर्ण ताकदीने कर्जत मतदार संघ काँग्रेससाठी मागण्यात येईल असे आश्वासन प्रदेश अध्यक्ष यांनी दिले असल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.

सोमवारी खोपोली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख यांना 189 कर्जत – खालापूर विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी उमेदवारी अर्ज टिळक भवन येथील प्रदेश कार्यालयात सुपूर्द करण्यात आला आहे. या वेळेस रिचर्ड जॉन(अध्यक्ष खोपोली शहर काँग्रेस), ई.बी. मुलानी (प्रदेश प्रतिनिधी), सागर जाधव, अबु अली खोत (उपाध्यक्ष रायगड जिल्हा), हैदर अली फक्की (उपाध्यक्ष अल्पसंख्याक सेल रायगड), जमाल भाई सोरटिया (सल्लागार खोपोली काँग्रेस), तय्यब शेख (अध्यक्ष युवक काँग्रेस खोपोली), मुक्तार शेख (अध्यक्ष पर्यावरण सेल खोपली) यांच्यासह रेखा जाधव महिला अध्यक्ष खोपोली व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version