क. अनिल आठल्ये
भारतीय लष्कराचे प्रमुख म्हणून राहिलेल्या जनरल एस. एफ. रॉड्रि्ग्ज यांचं अलिकडेच निधन झालं. शांततेच्या काळात त्यांच्याकडे देशाच्या लष्करप्रमुखपदाची धुरा होती. राजीव गांधी यांच्या काळात लष्कराने बंड करण्याचा प्रयत्न केला, त्याला रॉड्रिग्ज यांच्यासह अन्य एका लष्करी अधिकार्याची फूस होती, असं सांगितलं गेलं; परंतु त्यात काहीच तथ्य नव्हतं. किंबहुना रॉड्रिग्ज यांची ओळख त्या पलिकडे होती.
माजी लष्करप्रमुख जनरल एस. एफ. रॉड्रिग्स यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 1933 मध्ये मुंबईत झाला. लष्करात विविध पदं भूषवत ते 1990 ते 1993 या काळात भारतीय लष्कराचे प्रमुख राहिले. 1980 च्या दशकात त्यांनी लष्करात विविध पदं भूषवली. शांतताकाळात सैन्यात भ्रष्टाचार झाला. या भ्रष्टाचाराच्या विरोधात ते खंबीरपणे उभे राहिले. लष्करात अनेकदा अपप्रवृत्ती आढळतात. अशा अपप्रवृत्तींचा त्यांना राग होता. त्याचा त्यांनी आपल्या काळात खंबीरपणे बीमोड केला. तीन-चार लेफ्टनंट दर्जाच्या अधिकार्यांना त्यांनी सक्तीनं निवृत्त केलं. एका पत्रकाराने रॉड्रिग्ज यांच्या काळात त्यांना देशापुढच्या समस्येबाबत अनधिकृत प्रश्न विचारला. त्याला न टोलवता रॉड्रिग्ज यांनी भारतापुढे चीन आणि पाकिस्तान या शेजारी गुंड राष्ट्रांचीच मोठी समस्या आहे, असं सांगितलं होतं. त्यांच्या या विधानावरूनही गदारोळ झाला होता; परंतु वस्तुस्थिती तशीच असल्याचं नंतर स्पष्ट झालं. सैन्यातला भ्रष्टाचार निपटून काढण्याबाबत त्यांनी खमकी भूमिका घेतली. ते पापभिरू तसंच स्वच्छ प्रतिमेचे होते. काही वक्तव्यांवरून त्यांच्यावर टीका झाली, तरी त्यांच्याकडे कुणालाही बोट दाखवता आलं नाही. देशाचे राजकारणी नीट काम करत नाहीत, घटनाबाह्य वर्तन करतात, तेव्हा सेना शांत राहू शकत नाही. तिला खंबीर व्हावं लागतं. सेनेला बघ्याची भूमिका घेता येत नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यांच्या या विधानावरही काहूर माजलं होतं. त्यांच्यावर टीका झाली. त्यांच्या या विधानाचा संदर्भ राजीव गांधी यांच्या काळातल्या लष्कराच्या कथित बंडाशी जोडला जातो; परंतु त्याला काहीही अर्थ नव्हता. निवृत्तीनंतर त्यांची पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तिथेही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.
भारतात लोकशाही व्यवस्था इतकी भक्कम आहे की कधी लष्करी उठाव झाला नाही; मात्र माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात 1987 मध्ये हे सरकार उलथवून टाकण्यासाठी लष्करी उठावाचा प्रयत्न झाला होता, असा दावा माजी लेफ्ट. जन. पी. एन. हून यांनी आपल्या पुस्तकात केला होता. हून वेस्टर्न कमांडमध्ये (पश्चिम वाहिनी) कार्यरत होते. त्यांनी आपल्या ‘द अनटोल्ड ट्रूथ’ या पुस्तकात हा दावा करताना म्हटलं होतं, की पॅरा कमांडोजच्या तीन बटालियन्सना तेव्हा दिल्लीकडे कूच करण्याचे आदेश देण्यात आले होते. यात एक बटालियन वेस्टर्न कमांडची होती. राजीव गांधी यांची सत्ता उलथून टाकण्याच्या या योजनेत तत्कालीन लष्करप्रमुख जनरल कृष्णास्वामी सुंदरजी आणि लष्कराचे उपप्रमुख लेफ्ट. जन. एस. एफ. रॉड्रिग्ज यांचा सहभाग होता. (नंतरच्या काळात रोड्रिग्ज लष्करप्रमुखही झाले.) तत्कालीन राजकीय परिस्थितीत राजीव गांधी यांच्याशी मतभेद असलेल्यांची या कामी मदत घेण्याची योजना होती. या काळात कदाचित लष्कराचा उठाव झालाच असता तर केंद्रीय सत्ता लष्कराच्या हाती जाण्याच्या भीतीमुळे ग्यानी झैलसिंग यांनीही पुढे कोणतंही पाऊल उचललं नसावं, असा कयासही हून यांनी या पुस्तकातल्या एका प्रकरणात मांडला; परंतु त्यांचा हा दावा एअर मार्शल रणधीर सिंह यांनी खोडून काढला. भारतीय लष्कराचा वारसा आणि परंपरा पाहता लष्करी बंड केवळ अशक्य होतं, असं श्री. सिंह म्हणतात. दरम्यान, वरिष्ठ कर्नल के. एस. पाठक यांनीही हून यांचा हा दावा त्यांचा वैयक्तिक समज असल्याचं म्हटलं होतं. कदाचित दिल्लीत त्या काळी लष्कराच्या काही बटालियन बोलावण्याचा निर्णय झाला असेलही; मात्र त्यामागील कारणं वेगळी असतील, असं पाठक यांनी म्हटलं आहे. याचा संदर्भ थेट रॉड्रिग्ज यांच्यांशी होता, हे एव्हाना लक्षात आलं असेलच.
श्री. रॉड्रिग्ज एक कल्पक रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी देशासाठी अपार समर्पणाचा आणि सेवेचा वारसा सोडला आहे. रॉड्रिग्ज 1949 मध्ये भारतीय लष्करी अकादमीच्या संयुक्त सेवा शाखेत सामील झाले आणि 28 डिसेंबर 1952 रोजी आर्टिलरी रेजिमेंटमध्ये नियुक्त झाले. अनेक फील्ड आणि ऑटोमॅटिक आर्टिलरी युनिट्समध्ये सेवा दिल्यानंतर, त्यांनी 1964 मध्ये आर्टिलरी एअर ऑब्झर्व्हेशन पोस्टवर पायलट प्रशिक्षणासाठी अर्ज केला आणि तोफखाना विमानचालन पायलट म्हणून पात्रता प्राप्त केली. 1972 मध्ये त्यांनी विशिष्ट सेवा पदक मिळवलं. 1964 ते 1969 दरम्यान त्यांनी विमान आणि हेलिकॉप्टरवर 158 पेक्षा जास्त तास उड्डाण केलं. यामध्ये 1965 च्या युद्धातल्या 65 तासांच्या लढाऊ उड्डाणाचा समावेश होता. नंतर त्यांनी संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि 1971 मध्ये नवीन पद स्वीकारलं. 1971 मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धानंतर त्यांना आपल्या उत्कृष्ट सेवेसाठी ‘विशिष्ट सेवा पदक’ देण्यात आलं. 1979 ते नोव्हेंबर 1981 दरम्यान त्यांनी संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयात मुख्य प्रशिक्षक ब्रिगेडियर म्हणून काम केलं. रॉड्रिग्ज यांनी 1975 ते 1977 या काळात अति उंच भागात माउंटन इन्फंट्री ब्रिगेडचं नेतृत्व केलं. त्यानंतर रॉड्रिग्ज यांनी ब्रिटनमधल्या ‘रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीज’मध्ये 1978 च्या कोर्समध्ये भाग घेतला. ते 1979 ते नोव्हेंबर 1981 या काळात संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयात मुख्य प्रशिक्षक होते.
मध्यंतरीच्या काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतीय लष्कराचा केलेला ‘मोदीजी की सेना’ असा उल्लेख, विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या छायाचित्रांचा वापर या आणि अशा इतर अनेक बाबींमुळे नाराज झालेल्या लष्करातल्या काही निवृत्त अधिकार्यांनी एक पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती. संपूर्ण देशभर तो चर्चेचा विषय झाला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तसं पत्र पाठवण्यात आल्याचं म्हटलं होतं.
पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात लष्कराच्या नावावर मतं मागण्यापासून रोखलं जावं, अशी मागणी करणारं चार पानांचं पत्र लष्कराच्या 156 अव्वल सेवानिवृत्त अधिकार्यांनी एकत्र येऊन लिहिलं असल्याचं वृत्त होतं. त्यातल्या काहींनी या पत्रावर आपण सही केल्याचं मान्यही केलं होतं; परंतु हे पत्र आपल्याला मिळालं नसल्याचं राष्ट्रपती कार्यालयानं स्पष्ट केलं. ‘सोशल मीडिया’वर हे चारपानी पत्र व्हायरल झालं. त्या वेळी लष्करी कारवाईमागील रणनीतीचं श्रेय राजकीय नेतृत्वानं घेण्यास हरकत नाही; पण सैन्यदलांच्या कारवाईचं श्रेय त्यांनी घेऊ नये, अशी अपेक्षा मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे यांनी व्यक्त केली होती. या पत्रावर रॉड्रिग्ज यांचीही सही होती. त्याबाबत रॉड्रिग्ज म्हणाले होते की माझा 42 वर्षांचा कार्यकाळ राजकारणापासून पूर्णपणे दूर राहिला आहे.
मी आयुष्यात नेहमीच देशाला पहिलं स्थान दिलं आहे. अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवणारी व्यक्ती कोण आहे हे मला माहीत नाही.
रॉड्रिग्ज हे आयुष्यभर आपल्या तत्वांवर ठाम राहिले. कसोटीच्या क्षणी त्यांनी आपलं कर्तव्य चोख बजावलं. देशाचा लष्करप्रमुख ही फार मोठी जाबाबदारी; त्यांनी ती लिलया पेलली. कसोटीच्या प्रसंगी त्यांनी ठाम निर्णय घेतले. स्वत:वर भलत्या आरोपाचं बालंट येत आहे, असं दिसल्यावर त्यांनी निडर होऊन वस्तुस्थिती मांडली. राजकारणी आणि लष्कराच्या संबंधांविषयीही ते ठाम राहिले. अलिकडे हा स्पष्टवक्तेपणा कमी दिसतो. किंबहुना, राजकीय नेतृत्वाशी जुळवून घेण्याची प्रवृत्ती जगभर पहायला मिळते. यातून खरं तर लष्कराचा आब जपला जात नाही, असं जाणवतं. रॉड्रिग्ज अशा प्रकारांपासून दूर राहिले. त्यांचे नेतृत्वगुणच त्यांच्या कर्तबगारीची खरी ओळख ठरले. अशा या महान लष्करी अधिकार्याला मन:पूर्वक श्रध्दांजली.