। नेरळ । वार्ताहर ।
कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने दुसर्या लाटेनंतर आता पुन्हा एकदा निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे दोनदा लॉकडाऊनचा सामना केलेल्या माथेरानला आता लॉकडाऊन परवडणारे नाही. माथेरानचे अर्थचक्र हे केवळ पर्यटन व्यवसायावरच अवलंबून आहे. त्यामुळे मागील वेळेप्रमाणे विशेष प्रशासकीय घटक म्हणून माथेरानचे पर्यटन सुरु ठेवन्याची मुभा मिळावी, पर्यटनाबाबत सर्व खबरदारी आम्ही घेऊ असे निवेदन देत माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना साकडे घातले आहे.
तब्बल 2 वर्ष कोरोनाचा त्रास सहन केल्यानंतरदेखील कोरोना संक्रमित रुग्णसंख्या पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. नव्या वर्षात पाऊल ठेवतानाच रायगड जिल्ह्यात एका आठवड्यात कोरोना संक्रमित रुग्ण संख्या थेट हजारांपर्यंत जाऊन पोहचली आहे. तर राज्यात हा आकडा खूप मोठा आहे. त्यामुळे वाढता कोरोनाचा वेग पाहता शासनाकडून कोरोनाला रोखण्यासाठी पुन्हा निर्बंध जारी करण्यात आले आहेत. दिनांक 8 जानेवारी रोजी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने प्रसारित केलेल्या नवीन नियमावली नुसार स्थानिक पर्यटक स्थळांविषयी काही निर्बंध जाहीर केले आहेत. अशात माथेरानच्या नागरिकांचे उत्पन्नाचे साधन हे पर्यटकांवर आधारित असल्याने हे पर्यटन स्थळ जर बंद करण्यात आले तर इथल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. मागील वर्षी हि बाब लक्षात घेऊन शासनाने 25 जून 2021 रोजीच्या मंजूर टिपणी नुसार माथेरानला विशेष प्रशासकीय घटक म्हणून घोषित करत विशेष बाब म्हणून माथेरानचे पर्यटन सुरु करण्यात आले होते. त्याच आदेशानुसार माथेरानचे पर्यटन सुरु राहावे यासाठी माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि इतर मान्यवरांना निवेदन सादर केले आहे. माथेरानकरांचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा माथेरानकर व्यक्त करत आहेत. त्यामुळे आत शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
