ठेकेदाराचा हलगर्जीपणा नडला; देहेन  गावाचा संपर्क तुटला

| भाकरवड | जीवन पाटील |


अलिबाग तालुक्यातील भाकरवड देहेन येथे सुरू असलेल्या पुलाच्या कामातील उघड हलगर्जीपणा आणि नियोजनशून्य कारभारामुळे संपूर्ण देहेन गाव बाह्य जगापासून तुटल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर अपूर्ण ठेवलेले पुलाचे काम आणि वाहून गेलेला तात्पुरता बंधारा यामुळे गाव अक्षरशः कोंडीत सापडले आहे. पाण्याच्या वाढत्या प्रवाहात तात्पुरता बंधारा वाहून गेल्याने गावाकडे ये-जा पूर्णपणे बंद झाली आहे. पर्यायी मार्ग नसल्याने शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, दुग्धव्यवसायिक आणि रोजंदारीवर अवलंबून असलेले नागरिक अक्षरशः अडकून पडले आहेत. दैनंदिन जीवन ठप्प झाले असून ग्रामस्थांचा संयम संपत चालल्याचे चित्र आहे.


स्थानिकांचा थेट आरोप आहे की, प्रशासन आणि ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे हे संकट ओढवले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी काम पूर्ण करणे अपेक्षित असतानाही पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत ठेवण्यात आले. परिणामी, पावसाच्या पहिल्याच जोरात गावाचा संपर्क तुटला आणि संपूर्ण यंत्रणा अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
देहेन-भाकरवड परिसरात धरमतर खाडीच्या भरतीचे पाणी आणि नदीचा प्रवाह यांचा वर्षानुवर्षांचा धोका आहे. तरीही याकडे दुर्लक्ष करून अपूर्ण काम रेटल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, धोका माहित असूनही डोळेझाक करून काम केलं गेलं अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.


1989 आलेल्या महापुरात देहेन व भाकरवड या दोन्ही गावात वीस ते पंचवीस फुट पाणी शिरले होते. त्यामुळे गेल कंपनी प्रशासनाला वेळोवेळी अर्ज करुन पाण्याचा निचरा योग्य तो होईल अशा परिस्थितीत काम करण्याची विनंती केली होती. तसेच रस्त्यालगत चालू असलेले काम जर पूर्ण झाले व पूर्ववत पाणी जाण्याचा मार्ग बंद झाला तर पाण्याचा वेढा पूर्ण गावाला घेऊन गावाचे व येथील गोरगरीब शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होईल, याची माहिती ग्रामस्थ मंडळ भाकरवडचे अध्यक्ष शंकर बाळू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली होती. मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.


गावात विद्यार्थ्यांचे शिक्षण, दूध व शेतीमालाची वाहतूक, आरोग्यसेवा यावर गंभीर परिणाम झाला असून परिस्थिती अधिक बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी, गावाचा संपर्क तुटण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच तातडीने पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अपूर्ण पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे आणि जबाबदार अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी तीव्र मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा गावात तीव्र आंदोलन उभे राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version