लाकूडफाटा आणि चुलींच्याही किंमती वाढल्या, जगावे की मरावे सर्वसामान्य बेजार
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
इंधन दरवाढीने सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता जिल्ह्यात लाकूडफाटा आणि चुलीच्या किंमती महागल्या आहे. गॅसच्या किमतीत देखील 50 रुपयाने वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेची वाताहत होत आहे. मागीलवर्षी शंभर रुपयांना मिळणारी लाकडाची एक मोळी दिडशे रुपयांना झाली आहे. पाली सुधागडसह जिल्ह्यात गावखेड्यात व आदिवासी वाड्यावस्त्यांवर जेवण बनविण्यासाठी अजूनही अन्न शिजविण्यासाठी गॅस व स्टोव्ह ऐवजी चुलीचाच वापर केला जातो. तसेच काही मोठ्या गावांत देखील चूल व बंबाचा वापर केला जातो. मात्र आता लाकूडफाट्याच्या किमती वाढल्याने गरिबांना अन्न शिजविणे ही महाग झाले आहे. ताई पवार या आदिवासी महिलेने सांगितले की जळणासाठी लाकूड विकत घेणे आता परवडत नाही. म्हातार्या लोकांना जंगलातून लाकडे आणणे शक्य होत नाही. अशा वेळी अनेकांना पैसे वाचविण्यासाठी एकवेळचे जेवण करून दोनदा खावे लागते. याबरोबरच मागील वर्षी 100 व 200 रुपयांना मिळणार्या चुलींच्या किंमतीत कोरोना व लॉकडाऊनमुळे 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे पालीतील कुंभारकाम व्यवसाईक नारायण बिरवाडकर यांनी सांगितले. वाढत्या महागाईमुळे उदरनिर्वाह चालविण्यासाठी लाकडे व चुलींच्या किंमती वाढल्या आहेत.
शासनाने गरीब व आदिवासींना मोफत किंवा कमी किंमतीत गॅस सिलेंडर नियमित उपलब्ध करून द्यावेत. त्यामुळे त्यांची लाकूडफाट्यासाठी वणवण थांबेल. व खर्च देखील वाचेल.







