वीजबिल भरून महावितरणाला सहकार्य करावे; नागरिकांना आवाहन

। मुंबई । प्रतिनिधी ।
वीजबिल म्हणजे नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा ठराविक किंवा निश्‍चित केलेला शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर नाही. वीजबिल म्हणजे ग्राहकांनी प्रत्यक्षात वापरलेल्या विजेचे शुल्कच आहे. वीजजोडणी घेतलीच नाही तर वीजबिल किंवा विजेचे शुल्क भरण्याचा प्रश्‍नच नाही. तसेच वीजजोडणी घेतल्यानंतरही विजेचा वापर केला नाही तर केवळ स्थिर आकाराशिवाय एकही जादा पैसा भरावा लागत नाही. त्यामुळे अत्यावश्यक असलेल्या विजेचा वापर आपणाकडून होत असताना त्यापोटी आलेले विजेचे शुल्क म्हणजेच वीजबिल आहे व ते दरमहा नियमित भरणे हे ग्राहकांचे कर्तव्य आहे.
ना नफा, ना तोटा तत्वाने वीजसेवा देणार्‍या महावितरणवर एक ग्राहक म्हणून वीजखरेदी, पारेषण खर्च तसेच विविध कर्ज व त्याच्या हप्त्यांचे सद्यस्थितीत करोडो रूपयांचे दायित्व आहे. दुसरीकडे महावितरणच्या वीजग्राहकांकडे तब्बल 71 हजार 578 कोटी रुपयांच्या थकबाकीचा मोठा डोंगर आहे. या गंभीर आर्थिक संकटामुळे महावितरणच्या अस्तित्वाचा सध्या बिकट प्रश्‍न निर्माण झालेला आहे.
दैनंदिन जीवन संपूर्णपणे विजेवर अवलंबून असल्याने वीजबिलांचा भरणा करणे आवश्यक आहे. सध्या महावितरणच्या आर्थिक स्थितीचा गांभिर्याने विचार करून थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करून वीजग्राहकांनी सहकार्य करावे. तसेच शेतकर्‍यांना कृषीपंपांच्या वीजबिलांमधून संपूर्ण थकबाकीमुक्त होण्यासाठी मूळ थकबाकीमधील रकमेत सुमारे 66 टक्के सवलत देण्याची ऐतिहासिक योजना महावितरणने राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणली आहे. त्याचाही शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version