| चिरनेर | प्रतिनिधी |
विजबीलाचा भरणा करूनही वीज मीटर पुन्हा बसविण्यासाठी 18 हजारांची लाच घेताना बोकडवीरा-उरण येथील महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ लोकसेवक रामेश्वर निवृत्ती घनमोडे याला लाचलुचपत विभागाने सापळा रचून लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी उरण पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
तक्रारदार यांचे निर्भय वेब्रिज कार्यालयाच्या बाजूला कॅन्टीन व पार्कींगचा व्यवसाय आहे. सदर व्यवसायाकरीता त्यांनी महावितरण कंपनीकडून वीज मीटर घेतलेले आहे. त्याचे विजबिल न भरल्यामुळे महावितरण बोकडवीरा शाखेने वीज पुरवठा खंडीत करून सदरचे वीज मीटर काढून नेले. तक्रारदारांनी वीज बिल भरणाकरून वीज मीटर पुन्हा बसविण्याचे काम करून घेण्याकरिता तक्रारदार यांनी अधिकारपत्र दिलेले होते. त्यानंतर वीज मीटर पुन्हा बसविण्याकरीता लोकसेवक वायरमन रामेश्वर घनमोडे यांची तक्रारदारांनी भेट घेतली होती. मात्र, लोकसेवक घनमोडे यांनी विजमीटर पुन्हा जोडणी करणेकरीता शासकीय फी व्यतिरिक्त 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 18 हजार रुपये लाचेची रक्कम ठरली होती. याप्रकरणी तक्रारदाराने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 2 सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर खातरजमा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सापळा रचला होता. विर्गो लॉजेस्टीकचे मेनगेट समोरील रोडवर तक्रारदारांच्या सोनेट कारमध्ये 18 हजारांची लाच स्वीकारताना लोकसेवक रामेश्वर निवृत्ती घनमोडे याला रंगेहाथ पकडण्यात आले.





