| उरण | वार्ताहर |
उरण पंचायत समितीच्या शिक्षण विभागात पैसे दिल्याशिवाय कोणतेही काम होत नसल्याचा आरोप सेवानिवृत्त शिक्षकांकडून करण्यात आला आहे. निवृत्तीनंतर पेन्शन मंजुरीसाठी शिक्षकांना अनेकदा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. पेन्शनसाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर शिक्षकांना वाटते की आता पेन्शन मंजूर होईल; परंतु, शिक्षण विभागातील अधिकारी वर्ग त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जाते. पैसे दिल्यास फाईल तातडीने पुढे पाठवली जाते, मात्र पैसे न दिल्यास ती प्रकरणे दडपून ठेवली जात असल्याचा धक्कादायक आरोप काही सेवानिवृत्त शिक्षकांनी केला आहे. त्याबाबत संबंधित विभागाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. मात्र, प्राथमिक शिक्षक वर्गाकडे विचारणा केली असता त्यांनी याला दुजोरा देत, सेवानिवृत्त शिक्षकांची कामे सर्व कागदपत्रे ओके असूनही मानपान झाल्याशिवाय काम पूर्ण होत नसल्याचे सांगण्यात आले आहे.