| खोपोली | प्रतिनिधी |
मालमत्ता कर वसुलीसाठी खोपोली प्रशासन आक्रमक झाले आहे. 2024-25 या वर्षामधील थकीत तसेच चालू मालमत्ता कर वसूली करिता घरोघरी प्रत्यक्ष भेटी देत आहेत. तसेच, मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये घरपट्टी वसुली शिबिराचे आयोजन केले जात आहे. तर, कर भरण्यासाठी रिक्षाद्वारे देखील दवंडी दिली जात आहे. प्रशासनाकडून अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली कर वसुली टिम नेमण्यात आली असून ‘घरपट्टी विभाग आपल्या दारी’ ही मोहीमही राबविली जात आहे. जे कर भरण्यास टाळाटाळ करीत आहेत, त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली जात आहे. घरपट्टी न भरणाऱ्यांपैकी 13 गाळे, 38 सदनिका आणि 2 कंपनी नगरपरिषदेने सील बंद केलेले आहेत. दरम्यान, आधीनियमातील तरतुदी नुसार नागरिकांना प्रती महिना 2 टक्के शास्ति जादा भरणा करावा लागू नये म्हणून वेळेत मालमत्ता कर भरावे, असे अवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. पंकज पाटील यांनी नागरिकांना केले आहे.