| चिरनेर | प्रतिनिधी |
धुतुम परिसरातील नादुरुस्त व धोकादायक साकवचे स्ट्रक्चरल ऑडिट करून, सिडकोने निधी उपलब्ध करून, त्या ठिकाणी नव्याने साकावाचे बांधकाम करावे, अशी मागणी धुतूम ग्रामपंचायतीने सिडकोकडे केली आहे. धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांच्या जवळपास 700 ते 800 एकर जमिनी शासनातर्फे सिडकोने संपादित केल्या आहेत. तसेच, बऱ्याच जमिनी लॉजिस्टिक पार्क करिता संपादित करण्याचे काम सिडको मार्फत सुरू आहे. परिणामी संबंधित कार्यालयाच्या अखत्यारित असणाऱ्या जुन्या साकवांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून, त्याठिकाणी नव्याने बांधकाम करण्यासाठी धुतूम ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सिडको प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, 26 फेब्रुवारी 2024 रोजी वेवी ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बांधव बेलोंडखार खाडी किनारी मासेमारी करण्याकरिता गेले असता त्यांच्या अंगावर येथील खाडीवरील साकव पडल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत दोघांना आपला जीव गमवावा लागला होता. तर, दोघेजण गंभीर जखमी झाले होते. त्यातच आता धुतूम बैलांडोखार हा साकव सुद्धा मोडकळीस आला आहे. त्यामुळे येथे दुर्घटना घडून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर येथील पारंपारिक बांधबंधिस्तीची कामे होणे गरजेचे असल्याचे सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी सांगितले आहे.