| अलिबाग | प्रतिनिधी |
बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध भिक्षूंकडे देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहूजन आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत मंगळवारी (दि.4) जिल्हाधिकारी किशन जावळे यांना निवेदन देण्यात आले.
बिहार राज्यातील बुद्धगया महाबोधी महाविहार हे संपूर्ण बौद्ध बांधवांचे प्रार्थना स्थळ आहे. देशाबरोबरच जगभरातील अनुयायींच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. येथील बौद्ध महाविहाराचे पावित्र्य जपणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. परंतु, महाविहाराचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या ठिकाणी काही मंडळी अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचे काम अनेक वर्षापासून करीत आहेत. त्यामुळे महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध भिक्षूंकडे देण्यात यावे, यासाठी भिक्षुगण गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांना वंचित बहूजन आघाडीच्यावतीने पाठींबा दर्शविण्यात आला आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिपक गायकवाड, महासचिव धर्मेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेतली. त्यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी वरिष्ठ पदाधिकारी प्रदिप ओव्हाळ, संघटक राहुल गायकवाड, उपाध्यक्ष देवेंद्र कोळी, चंद्रकांत साळुंखे, अशोक वाघमारे, सुनील गायकवाड, प्रदीप ढोले, लोकेश यादव, सुमित जाधव, स्वप्नील गायकवाड, उत्तम ओव्हाळ, पंकज गायकवाड, छाया शिरसाठ, कविता वाघमारे, प्रफुल कदम, गणेश बनसोडे, भगवान खंडागळे, विठ्ठल पवार, सुभाष गायकवाड, चंद्रकांत जगताप, तुकाराम शिंदे, महेश रेवसकर, संजय गोतावळे, राम म्हात्रे आदी उपस्थित होते.