रायगड जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग
| अलिबाग | प्रतिनिधी |
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या घोषणांच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यासाठी शेती आणि ग्रामीण समृद्धीवर अर्थसंकल्पोत्तर वेबिनार शनिवारी (दि.1) आयोजित करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील हजारो शेतकऱ्यांसमवेत ऑनलाईन संवाद साधला. या उपक्रमात रायगड जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होतो. शेतकऱ्यांना सुलभ व स्वस्त कर्ज देण्यासाठी सरकारने नवीन उपक्रम म्हणून सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत केल्याची माहिती देण्यात आली.
अलिबागमधील पंतनगर येथे हा वेबिनार घेण्यात आला. या वेबिनारमध्ये जिल्हा अग्रणी प्रबंधक विजय कुलकर्णी, सुधीर गायकवाड, बँक ऑफ महाराष्ट्र शाखाधिकारी संजय गायकवाड, युनियन बँक शाखाधिकारी ललित तुडाळ, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे योगेश पाटील आदी मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, वेगवेगळ्या बँकेतील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजेनची माहिती देत मार्गदर्शन केले. अर्थ संकल्पामध्ये देशातील शेतकऱ्यांवर योग्य प्रकाश टाकला आहे. विकासात्मक हस्तक्षेपासाठी दहा प्रमुख क्षेत्रांपैकी शेतीला ओळखले जाते. कृषी क्षेत्र भारताच्या आर्थिक प्रगतीला चालना देणारे एक शक्तीशाली इंजिन आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. या वेबिनारच्या माध्यमातून थेट पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.