खवय्यांच्या खरेदीसाठी उड्या, यंदा किमती वाढल्या
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
गावरान कच्च्या कैऱ्या तसेच आंब्यांचा हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये गावरान कैऱ्या व गावरान आंबे विक्रीसाठी आले आहेत. मात्र, यंदा अवकाळीचा फटका व प्रतिकूल हवामानामुळे आवक कमी आहे. परिणामी कैऱ्या आणि आंब्यांचे भाव वाढले आहेत.
रायगड जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये कैऱ्या लागल्या आहेत. तर, अनेक ठिकाणी कैऱ्या परिपक्व झाल्या आहेत. उन्हाळा सुरू झाला की हा रानमेवा जिल्ह्यातील छोट्या मोठ्या बाजारांत उपलब्ध होतो. खासकरून आदिवासी महिलांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी महिला, फळ व भाजी विक्रेते कैऱ्या व आंबे घेऊन जवळपासच्या बाजारात विक्रीसाठी घेऊन येत आहेत. काही ठिकाणी किलोने कैऱ्या मिळत आहेत. तर, काही जण नगावर विकत आहे. यावेळी ताई शिद या कैरी विक्रेतीने सांगितले की, माळरान व जंगलात यंदा खूपच कमी आंबे आले आहेत. अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे यंदा कैऱ्या आणि आंब्यांचा भाव वाढला आहे. जिल्ह्यातील काही फळविक्रेत्यांकडे स्थानिक कैऱ्यांबरोबरच कर्नाटकी कैऱ्या विक्रीसाठी आल्या आहेत. गतवर्षी 50 रुपयांना पाच ते सहा कैऱ्या असलेला एक वाटा आता 80 ते 100 रुपयांना मिळत आहे. तर, पिकलेल्या गावरान आंब्याचा भाव डजनाला 400 ते 600 रुपये असा आहे. मात्र, कैऱ्या आणि आंब्यांचे भाव वाढले असले तरी ते खरेदीसाठी खवय्ये मोठी गर्दी करत आहेत.
स्थानिकांना रोजगार
जंगलात व माळरानावर मिळणाऱ्या या गावरान कैऱ्या आणि आंबे स्थानिक तसेच आदिवासी बांधव तोडून स्थानिक बाजारात विकायला आणतात. या कैऱ्या विकून स्थानिकांना विशेषतः महिलांना चांगला रोजगार देखील मिळतो.
जेवणाची लज्जत वाढवितात
ताज्या आणि सुक्या मासळीचे कालवण, वरण यामध्ये कैऱ्या टाकल्या जातात. त्यामुळे जेवण रुचकर व लज्जतदार होते. कच्च्या कैऱ्या बारिक कापून मसाला, हळद, तेल आणि मीठ टाकुन खाल्ल्या जातात. तसेच, या कैऱ्यांचा वापर घरगुती लोणचे तयार करण्यासाठी देखील केला जातो. त्यामुळे घराघरांमध्ये लोणच्याच्या तयारीला सुरुवात झालेली दिसत आहे.
