खारघरमध्ये दाम्पत्याला दगडाने मारहाण

। पनवेल । प्रतिनिधी ।

खारघरमध्ये पहाटेच्या सुमारास दाम्पत्याला दगडाने मारहाण करून त्यांच्याकडील सुमारे 95 हजार रुपये किमतीचा आयफोन 15 प्रो मॅक्स लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी खारघर पोलिसांनी रबिलाल रोबन टुडू (32) याला अटक केली आहे.

कोपरा गावाच्या पुढे, खारघर टोलनाक्याजवळ गणपती तलावाकडे जाणाऱ्या पादचारी पुलावर ही घटना घडली. तक्रारदार प्रगती सुरेश घंगाळे ऊर्फ प्रगती रोहन खिलारी (29) आणि त्यांचे पती रोहन खिलारी हे तेथून जात असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांना दगडाने मारहाण केली. त्यानंतर आरोपीने दाम्पत्याकडील 95 हजार रुपये किमतीचा आयफोन 15 प्रो मॅक्स घेऊन घटनास्थळावरून पलायन केले. या मोबाईलमध्ये जिओ आणि एअरटेल कंपनीची सिमकार्ड असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात रोहन खिलारी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच खारघर पोलिसांनी तपास सुरू करून आरोपी रबिलाल टुडू याला अटक केली. याप्रकरणी पुढील तपास खारघर पोलीस करीत आहेत.

Exit mobile version