माणगावात न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार

| माणगाव | प्रतिनिधी |

‌‘समान काम, समान वेतन‌’ या न्याय्य मागणीसाठी राज्यातील दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत आंदोलनाला माणगाव न्यायालयातील कर्मचाऱ्यांनीही पाठिंबा दिला आहे. माणगाव न्यायालयात मंगळवारी (दि.17) कामकाज बंद आंदोलन करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांप्रमाणे दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, अशी प्रमुख मागणी या आंदोलनातून करण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयामार्फत दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव दि. 31 जानेवारी 2025 रोजी शासनाकडे सादर करण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावाला 20 ते 21 महिन्यांचा कालावधी उलटूनही शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नसल्याचा आरोप न्यायालयीन कर्मचारी महासंघाने केला आहे. समान स्वरूपाचे काम आणि जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मिळावी, ही कर्मचाऱ्यांची प्रमुख भूमिका आहे.

Exit mobile version