मनसुख मांडवीय यांची माहिती
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
जगातील 96 देशांनी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला मान्यता दिल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. मांडवीय म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेने आतापर्यंत 8 लशींचा आपत्कालीन वापराच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे. आम्हाला आनंद आहे की, यामध्ये 2 भारतीय लशींचा सममावेश आहे. कोव्हॅक्सिन आणि कोवीशील्डचा यामध्ये समावेश असून जगातील 96 देशांनी या दोन्ही लशींना मान्यता दिली आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन वापराच्या यादीत समाविष्ट केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.
याप्रमाणेच, जिथे कोरोना लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवली गेली नाही, अशा जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन लस देण्याचे आदेश केंद्रीय मंत्र्यांनी दिले होते. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने 18 वर्षांवरील अधिक वयाच्या लोकांसाठी कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.
डब्लूएओने दिलेल्या मान्यतेनंतर आता कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांना कोणत्याही निर्बंधांशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार आहे. कोव्हॅक्सिनशिवाय जगात फायजर आणि एनबायोटेकची कोमिरनेटी, एस्ट्राझेनकाची कोविशील्ड, जॉन्सन अँड जॉन्सनची लस, मॉडर्नाची एमआरएनए1273, सिनोफार्मची बीबीआयबीपी कोर्वी आणि सिनोव्हॅक्ची कोरोनावॅक या लशींचा समावेश आहे.