उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यायांना निवेदन; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
| वावोशी | प्रतिनिधी |
सामाजिक कार्यकर्ते सुनील सोनावणे आणि मोनिकेत पाटील यांच्यावर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ बौद्ध समाजबांधव, आंबेडकरी अनुयायी, कामगार आणि विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांना निवेदन देत दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दि.23 जुलै रोजी काही समाजकंटकांनी लोखंडी रॉडसह सुनील सोनावणे व मोनिकेत पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सामाजिक न्यायासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांवर झालेला हा हल्ला केवळ एका व्यक्तीवरील नसून, समाजात भीतीचे वातावरण निर्माण करणारा आणि कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारा प्रकार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे हल्ल्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, भारतीय न्याय संहिता व इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करावी, हल्ल्यामागील सूत्रधार व सहआरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी, पीडितांना आवश्यक कायदेशीर मदत व संरक्षण द्यावे तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी अखिल भारतीय बौद्ध महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिलीप मोरे, दीपक खाडे, रिपब्लिकन कार्यकर्ते महेंद्र धनगावकर, गोपीनाथ सोनावणे, अशोक गोतार्णे, सूर्यकांत कांबळे, जतिन मोरे, राकेश गायकवाड, गणेश मोरे, संदीप गायकवाड, पांडुरंग मोरे, जगदीश कांबळे, भगवान यादव, पंकज सोनवणे, दिनेश मोरे, सचिन मोरे, अजित मोरे, दीपक गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, शिवाजी राठोड, अतिश सोनावणे, रुपेश कांबळे, प्रफुल्ल सोनावळे, शरद थोरात, अजय सोनावणे यांच्यासह छत्तीशी व खालापूर परिसरातील बौद्ध समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
सुनील सोनावणे हे अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी कामगारांच्या प्रश्नांसाठी युनियन स्थापन करून अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले. त्याचबरोबर त्यांनी बांधकाम क्षेत्रातही पाऊल टाकत स्वतःच्या कष्टाच्या जोरावर प्रगती करण्यास सुरुवात केली होती. ही प्रगती काही प्रस्थापितांच्या डोळ्यात खुपत होती. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह असून या प्रकरणामागील सर्व सूत्रधारांचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
महेंद्र धनगावकर,
रिपब्लिकन कार्यकर्ते
सुनील सोनावणे यांनी नेहमीच सामान्य नागरिक, कामगार आणि अन्यायग्रस्तांच्या बाजूने उभे राहून संघर्ष केला आहे. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा निष्पक्ष व सखोल तपास करून दोषींना तातडीने अटक करावी आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची खात्री करावी.
अतिश सोनावणे,
स्थानिक ग्रामस्थ
