बोगस क्रीडा प्रमाणपत्राला चाप

| पुणे | प्रतिनिधी |

राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये 5 टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने मिळण्याकरिता क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने क्रीडा ई-प्रमाण ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत प्रणाली कार्यान्वित केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर सर्व शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंना आता क्रीडा ई-प्रमाणपत्राची प्रत जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रमाणपत्राशिवाय खेळाडू संवर्गातून अर्जाचा विचार केला जाणार नाही, तसेच ज्या खेळांचे अभिलेख प्रणालीवर उपलब्ध आहे, त्यांनी तत्काळ या प्रणालीचा लाभ घेऊन आपले डिजिटल पडताळणी प्रमाणपत्र घरबसल्या प्राप्त होणार आहे. ज्या खेळाडूंनी यापूर्वी विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून प्रमाणपत्रांची पडताळणी केलेली आहे, त्यांनी यापुढे शासकीय व निमशासकीय भरतीसाठी अर्ज सादर करावयाचा असल्यास, या प्रणालीद्वारे प्रमाणपत्र तयार करून घेणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आणि मार्गदर्शक सूचनांसाठी खेळाडूंनी https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहल क्रीडा उपसंचालक सुधीर मोरे यांनी केले आहे.

Exit mobile version