पुलावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्याची मागणी
| माणगाव | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव शहरातील काळ नदीवरील नव्याने बांधण्यात आलेला पूल आणि त्यालगतचा रस्ता गंभीर अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंचा भराव खचल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा, खड्डे आणि खचलेले भाग निर्माण झाले असून, वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुलाच्या दक्षिण व उत्तर बाजूस मातीचा भराव खाली बसल्याने महामार्गाची स्थिती धोकादायक बनली आहे. दररोज हजारो वाहने या मार्गावरून धावत असतात. त्यामुळे प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पुलाचे काम घाईघाईने पूर्ण करण्यात आले. भराव करताना आवश्यक तांत्रिक निकषांचे पालन करण्यात आले नाही, तसेच मातीचे योग्य रोलिंग व मजबुतीकरण न केल्याने भराव सुरुवातीपासूनच कमकुवत राहिला. परिणामी काही दिवसांतच रस्त्यावर भेगा पडू लागल्या आहेत. डांबरीकरणाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काम मुदतीत पूर्ण न केल्याने संबंधित ठेकेदारावर आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, दंड वाढू नये म्हणून कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करून काम उरकण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. माणगावमधील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकारांनी पुलाची तातडीने तपासणी करून सुरक्षिततेचा अहवाल येईपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याची मागणी केली आहे.
विशेष म्हणजे, याच ठिकाणी असलेला काळ नदीवरील जुना पूल ब्रिटिश काळात सन १८७१ मध्ये बांधण्यात आला होता. दीडशे वर्षांहून अधिक काळ लोटूनही तो पूल आजही मजबूत असल्याचे नागरिक सांगतात. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाने बांधण्यात आलेल्या नव्या पुलाची अल्पावधीत झालेली अवस्था अनेक प्रश्न निर्माण करणारी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील नव्याने बांधण्यात आलेल्या इतर पुलांचेही स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रवाशांच्या जीविताची सुरक्षा हीच प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ज्ञानदेव पोवार
“पुलाचे संपूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट करून तज्ज्ञांकडून त्याच्या सुरक्षिततेचा अहवाल जाहीर करण्यात यावा. पुलातील त्रुटी दूर करून आवश्यक दुरुस्ती आणि मजबुतीकरण पूर्ण झाल्यानंतरच वाहतूक सुरू करावी, अन्यथा नागरिकांच्या जीविताशी खेळ होऊ नये म्हणून पूल बंद ठेवावा.
माजी नगराध्यक्ष







