संपूर्ण रायगड रोडच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी
| महाड | प्रतिनिधी |
किल्ले रायगडकडे जाणाऱ्या मुख्य महामार्गावरील नाते खिंड परिसरात अवघ्या आठ दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या रस्त्याला तडे गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक, वाहनचालक तसेच शिवप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित काम करणाऱ्या अक्षय कॉन्स्ट्रक्शन कंपनीच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
नाते खिंड ही रायगड किल्ल्याकडे जाणारी अत्यंत महत्त्वाची वाहतूक कडी मानली जाते. आगामी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढणार आहे. अशा वेळी नुकतेच तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर तडे गेल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक वाहनचालकांनी रस्त्याच्या दर्जाबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित कामात निकृष्ट साहित्याचा वापर झाल्याचा आरोप केला आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, काम पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच रस्त्याची अवस्था खराब होऊ लागली. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला खच दिसून येत असून, पावसाळा सुरू झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोट्यवधी रुपयांची कामे होत असताना दर्जेदार काम अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात निष्काळजीपणा दिसत आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.
दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण रायगड रोडचे स्वतंत्र तज्ज्ञ समितीकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशीही मागणी पुढे येत आहे. प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग याबाबत काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
