राहीला इलेव्हन निजामपूर संघास अंतिम विजेतेपद
अक्षय म्हात्रेची सामन्यात धुवाधार शतकी खेळी
। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव येथील मंगु स्टार क्रिकेट क्लब आयोजित वाकडाई चषक क्रिकेट स्पर्धेत राहीला इलेव्हन निजामपूर संघाने अंतिम सामन्यात आय्यान इलेव्हन माणगाव संघाचा पराभव करीत प्रथम क्रमांक पटकाविला. अंतिम सामन्यात राहीला इलेव्हन निजामपूर संघाने निर्धारित 5 षटकात 2 बाद 134 धावा फाटकावून आय्यान इलेव्हन माणगाव संघासमोर 135 धावांचे अवघड आव्हान ठेवले. हे आव्हान आय्यान इलेव्हन माणगाव संघाला पेलवले नाही. त्यांना 5 षटकात केवळ 34 धावा करता आल्या. अंतिम सामन्यात 100 धावांनी मोठा विजय राहीला इलेव्हन निजामपूर संघाने मिळविला. अंतिम सामन्यात राहीला इलेव्हन निजामपूर संघाकडून खेळणारा अलिबागचा डावखुरा हाताचा आक्रमक शैलीचा फलंदाज अक्षय म्हात्रे याने धुवाधार वादळी नाबाद शतकी खेळी केली. त्याने केवळ 22 चेंडूत 106 धावा फाटकाविताना 15 षट्कार व 2 चौकारांची आतषबाजी करून माणगावातील क्रिकेट शौकिनांना बेहद खुश केले. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 32 नामवंत संघानी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत उपविजेते आय्यान क्रिकेट क्लब माणगाव संघ व्दितीय तर ,तृतीय साई क्रिकेट संघा,चतुर्थ क्रमांकाचे विजेते न्हावे क्रिकेट संघा राहीले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून साई संघाचा आक्रमक शैलीचा फलंदाज खालिद बंदरकर, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आय्यान क्रिकेट क्लब माणगाव संघाचा गोलंदाज तेजस मोहिते तर स्पर्धेतील मालिकावीराचा बहुमान राहीला इलेव्हन निजामपूर संघातील अक्षय म्हात्रे यांनी पटकाविला. या सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.सदर स्पर्धेत हर्षल मुंढे यांनी मराठीतून धावते समालोचन केले. स्पर्धेच्या उदघाटन व बक्षीस वितरण संतोष खडतर, नितीन दसवते, चिन्मय मोने, रोशन जाधव, राहुल दसवते, गणेश जोरकर, प्रवीण शिंदे, अनिल जाधव, दीपेश जाधव, अविनाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.